“मराठी तरुणांना उद्योगाच्या नावाखाली वडापावाच्या गाडीपर्यंतच मर्यादित ठेवलं” अमीत साटम यांचा ठाकरेंवर घणाघात
मुंबई, दिनांक १३ जानेवारी २०२६
राज ठाकरे यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणून भारतीय जनता पार्टी मुंबई अध्यक्ष मान. श्री अमीत साटम यांनी वसंतीस्मृती कार्यालय दादर येथे पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. काल छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे झालेल्या महासभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुपारी पत्रकार परिषद घेत, “माझा कोणत्याही उद्योग-धंद्यांना विरोध नाही. मात्र एकाच उद्योगपतीने दहा वर्षांत एवढी मोठी झेप घेणं खटकतंय.” असं म्हटलं होतं. त्यावर उत्तर म्हणून श्री. अमीत साटम यांची पत्रकार परिषद पार पडली.
पत्रकार परिषदेत बोलताना अमीत साटम म्हणाले, “काल मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंचा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा उघडकीस आणला. महाराष्ट्रात उद्योग कशाप्रकारे आले यावर विस्तृत विश्लेषण दिलं. यावर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिलंय. उद्योगांना माझा विरोध नाही मात्र कमी वेळात मोठे होणाऱ्या उद्योगपतींवर माझा आक्षेप आहे असं म्हटलंय. मराठी तरुणांना उद्योजक बनवायची नीती देवेंद्र फडणवीस केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मागची काही वर्षे करत आहेत. पण या ठाकरे बंधूंनी मराठी तरुणांना उद्योगाच्या नावाखाली वडापावाच्या गाडीपर्यंतच मर्यादित ठेवलं आहे.”
“ठाकरेंनी १९९७ साली शिवउद्योग सेनेची स्थापनी केली. फंड मिळवले. पण या मार्फत किती तरुणांना उद्योग मिळाला? किती मराठी तरुणांना यांनी मोठं केलं? याचं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी द्यावं. ठराविक एका उद्योगपतीला टार्गेट करणारे राज ठाकरे स्वतःची एक्स्पोन्शियल ग्रोथ कोहिनूर मॉलच्या माध्यमातून कशी झाली यावर कधी बोलणार आहेत. कोहिरनूर मीलच्या जागेवर उभारलेल्या कोहिनूर मॉलमध्ये किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या याचं उत्तर राज ठाकरे यांनी द्यावं.” असा घणाघात श्री अमीत साटम यांनी केला.
“राज ठाकरे नेहमी मराठीची सक्ती करतात. त्यांनी करावी माझा त्याला आक्षेप नाही मात्र मग या ठाकरेंची मुलं मराठी शाळांमध्ये न जाता बॉम्बे स्क्वॉटिश नावाच्या शाळेत का शिकली. कॉलेजमध्ये त्यांनी जर्मन आणि फ्रेंच या भाषा का शिकल्या. याचंही उत्तर राज ठाकरेंनी द्यावं. मनाचा मोठेपणा जपणाऱ्या मराठी माणसाची बदनामी करणाऱ्या राज ठकरेंना शेवटी मी खुलं आव्हान देतोय की त्यांनी आपल्या नातवाचा प्रवेश बालमोहन विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत घेऊन दाखवावा.” असाही टोला अमीत साटम यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
याशिवाय पत्रकारांच्या प्रश्नोत्तरांना उत्तरे देताना ते म्हणाले, “अदानींबद्दल जर ठाकरेंचं ठाम मत असेल तर त्यांनी अदानींच्या गळाभेटी का घेतल्या त्यांना घरी का बोलवलं. अदानींची कंपनी काही नवीन नाही. त्यामुळे एखाद्याला उगाचच टार्गेट करण अतिशय चुकीचं आहे. भ्रष्टाचाराची भाषा करणाऱ्या ठाकरेंनी २५ वर्षें मुंबई महानगरपालिकेत राहून कशाप्रकारे पापाचा पैसा लाटला हे सर्वश्रुत आहे. २०१९ नंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर नेऊन ठेवलं आहे.”

