पुणे –
पुणे शहराचा विकास करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) कटिबद्ध असून दोन्ही पक्ष एकत्रितपणे महापालिका निवडणूक लढवत आहेत. मात्र मतांची विभागणी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी वेगळी आघाडी उभारली असून त्यामुळे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होत आहे, असा आरोप काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेले मत म्हणजे भाजपला दिलेले मत आहे,” असे ठाम मत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
या वेळी शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष गजानन थरकुडे, काँग्रेसचे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, सरचिटणीस प्राची दुधाने यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे, तर भाजपने काही गुंडांना परदेशात पळून जाण्यास मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे पुणेकरांमध्ये बदलाची अपेक्षा निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने प्रयत्नपूर्वक प्रचार केला असून शिवसेना (उबाठा)सोबत समन्वयाने प्रचार राबवण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दोन्ही पक्षांचे अनेक वरिष्ठ नेते प्रचारात सक्रिय सहभागी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) उल्लेखनीय कामगिरी करतील, असा दावा त्यांनी केला. भाजपला स्वतःच्या कामावर विश्वास असता, तर त्यांनी ४३ माजी नगरसेवकांची तिकिटे कापली नसती. अंतर्गत सर्वेक्षणात हे उमेदवार निवडून येणार नाहीत, असे स्पष्ट झाल्यानेच ही कारवाई करण्यात आली, असेही ते म्हणाले.
खासदार मुरलीधर मोहोळ ज्या-ज्या ठिकाणी प्रचारासाठी जात आहेत, तेथे नागरिक जैन बोर्डिंग प्रकरणाबाबत प्रश्न विचारत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. भाजपने सत्तेत असताना शहराचा अपेक्षित विकास केला नाही. काँग्रेस काळातील योजनाच पुढे नेऊन केवळ त्यांची नावे बदलण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांनी मेट्रोची संकल्पना पुढे आणली होती. पुण्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार करता २०० किमी मेट्रो अपेक्षित होती, मात्र ती केवळ ३२ किमीपर्यंतच मर्यादित राहिली आहे.
शहरातील विकासकामे महापालिकेमार्फत होणे अपेक्षित असताना भाजपचे नेते टेंडरमधील टक्केवारीत अडकले असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. कोथरूड भागातच १३४ कोटी रुपयांची कामे करून शहरातील इतर भागांवर निधीअभावी अन्याय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटी योजना, २४/७ पाणीपुरवठा योजना आणि बीआरटी योजना भाजपने गुंडाळल्याचा दावाही त्यांनी केला.
यावेळी गजानन थरकुडे म्हणाले की, शहरातील टेकड्या फोडणे आणि नदीपात्र सुधारण्याच्या नावाखाली नदीपात्रात भर टाकून ते अरुंद केले जात आहे, त्यामुळे पुण्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. भाजप मतविभाजनासाठी इतर पक्षांतील कार्यकर्ते व नेते फोडत असल्याचा आरोप त्यांनी केला. पुणेकर जनता सुज्ञ असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जबाबदार लोकप्रतिनिधींनाच निवडून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध करून पुणेकरांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत – काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे
Date:

