पुणे –
पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला १२० ते १२५ जागा मिळतील आणि बहुमतासह भाजपचाच महापौर होईल, असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारची भक्कम साथ आगामी काळात मिळणार असून पुणेकर विकासाला प्राधान्य देतील, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना मोहोळ म्हणाले की, भाजपने संपूर्ण प्रचार काळात विकासकेंद्रित मुद्द्यांवर भर दिला. प्रचाराची पातळी न घसरवता सकारात्मक अजेंड्यासह मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. ट्रिपल इंजिन सरकारमुळे २०१७ नंतर पुण्यात विकासाला गती मिळाली असून मेट्रोचे काम देशात सर्वाधिक वेगाने सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले. निवडणूक निकालानंतर कोणत्याही अन्य पक्षासोबत जाणार नाही, असे स्पष्ट करत पुणेकरांच्या अपेक्षांनुसार भाजप स्वतंत्रपणे काम करेल, असे त्यांनी सांगितले.
प्रचाराबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले की, मागील १५ दिवसांत भाजपने विविध माध्यमांतून प्रभावी प्रचार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला. आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनीही प्रचार केला. स्वतः मोहोळ यांनी पुण्यातील २७ प्रभागांत रॅली काढल्या. एका दिवसात सुमारे तीन लाख घरांपर्यंत संपर्क साधण्यात आला. पारंपरिक प्रचारासोबत सोशल मीडियाचा आधुनिक पद्धतीने वापर करण्यात आला.
महापालिकेत गेल्या पाच वर्षांत करण्यात आलेली विकासकामे तसेच केंद्र व राज्याच्या विविध योजना नागरिकांपुढे मांडण्यात आल्या. भविष्यातील विकासाचा आराखडा ‘व्हिजन संकल्पपत्रा’द्वारे सादर करण्यात आला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने भाजपला मतदारांचा विश्वास पुन्हा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना मोहोळ म्हणाले की, गुन्हेगार उमेदवार राष्ट्रवादीचे नाहीत, असे अजित पवार यांनी जाहीर करावे. गुंड निलेश घायवळला परदेशात जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्यांनी सिद्ध केल्यास मी राजकारणातून निवृत्त होईन, अन्यथा अजित पवारांनी राजकारण सोडावे, असे आव्हानही त्यांनी दिले. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, रवींद्र साळेगावकर उपस्थित होते.
पुण्यात मनपा निवडणुकीत भाजपला १२० ते १२५ जागा मिळणार– केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
Date:

