आबा बागुल यांच्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत
पुणे
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सांगतेची रॅली रद्द करण्याचा निर्णय प्रभाग क्रमांक ३६ (ड) सहकारनगर – पद्मावतीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत आबा बागुल यांनी घेतला. प्रचारासाठी गर्दी वाढवण्याऐवजी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला प्राधान्य देणारा हा निर्णय असल्याचे मत व्यक्त करताना नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
प्रभाग क्रमांक ३६ (ड) सहकारनगर – पद्मावतीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत आबा बागुल यांच्या प्रचाराला बारा दिवस नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सलग सहा वेळा नगरसेवक असल्याने कोपरा सभा, पदयात्रा, घरोघरी संवादातून आबा बागुल यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे. सातव्यांदा निवडणुकीला सामोरे जात असल्याबद्दल नागरिकांनीही उत्साहात त्यांचे स्वागत केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मात्र प्रचार करतानाही आबा बागुल यांनी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली.
मंगळवारी प्रचाराच्या सांगतेला त्यांनी रॅली न काढण्याचा निर्णय जाहीर करून जबाबदार लोकप्रतिनिधीचा आदर्श सर्वांसमोर ठेवला. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, विद्यार्थ्यांचे शिक्षण, नोकरदारांचा वेळ आणि रुग्णवाहिकांना अडथळा होऊ नये, यासाठी प्रचाराच्या सांगतेची रॅली रद्द केल्याचे आबा बागुल सांगितले. शिवाय हल्ली राजकारणाचा स्तर बिघडत आहे. विशेषतः तरुणांना अशा रॅलीमुळे उत्साह येतो पण प्रतिस्पर्धी उमेदवार आमने – सामने आल्यावर तणाव कसा निर्माण होईल, यासाठी तरुणांना भडकवून देण्याचे कारस्थान काहींकडून होते. परिणामी त्याचा फटका नागरीकांना बसतो. त्यामुळे ताणतणाव टाळण्यासाठी अशी कृती प्रत्येकाने करावी असेही त्यांनी नमूद केले.
आबा बागुल पुढे म्हणाले की,विकास म्हणजे केवळ घोषणा नव्हे, तर जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्यानुसार उपाययोजना अंमलात आणणे महत्वाचे आहे.त्यालाच आजवर मी प्राधान्य दिले आहे.त्यामुळे सलग सहा वेळा मला नागरिकांनी निवडून दिले आहे.यंदा सातव्यांदा मी निवडणूक लढवत आहे. कारण माझी आत्मीयता जनतेप्रती आहे आणि जनतेच्या खंबीर साथीने यंदा नवा इतिहास घडणार आहे.
लोकशाही बळकट ठेवण्यासाठी पैशाच्या आमिषाला बळी पडू नका असे आवाहन करताना ते म्हणाले ,केवळ मतांसाठी नव्हे तर आपली मतेही प्रभावी ठरावीत हे दाखवून द्या. सलग सहा वेळा नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी तो सार्थही ठरविला. युवाशक्तीची ताकद काय असते,हे नव मतदारांनी ओळखावे. आपला आवाज,आपला अधिकार आणि आपले कर्तव्य बजावण्यासाठी जसे आपले वडीलधारी, कुटुंबजन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले,तशीच कणखर साथ युवा मतदारांनी द्यावी,असे आवाहनही आबा बागुल यांनी केले आहे.

