- गुन्हेगार आणि सावकार यांना सत्तेपासून दूर ठेवा — रमेश बागवे
पुणे : भाजप केंद्र व राज्यात सत्तेत असूनही सर्वसामान्यांची फसवणूक, गुन्हेगारी व जातीयवाद वाढत असल्याने पुण्यासारखे विद्येचे माहेरघरही असुरक्षित झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करणे आवश्यक आहे, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी लोहियानगर येथील प्रचार सभेत केले.
अखिल भारतीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे ,अविनाश बागवे ,रफिक शेख ,दिलशाद शेख य उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत बोलताना बागवे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे उमेदवार हे आपल्या प्रभागातीलच, उच्चशिक्षित व सेवाभावी असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
भाजपकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व व्याजाच्या व्यवसायाशी संबंधित उमेदवारांना पुढे केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी जातीयवादाच्या आधारे जनतेची दिशाभूल होत असल्याचे नमूद केले. महापालिकेची तिजोरी रिकामी करून विकासाचे खोटे दावे केले जात असून केंद्र व राज्यात सत्ता असतानाही नागरिकांच्या जीवनात कोणताही ठोस बदल झालेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
तरुणांना रोजगार देण्याऐवजी धर्माच्या नावाखाली भडकवण्याचे काम भाजप करत असल्याचे सांगत बागवे म्हणाले की, काँग्रेसचे विचार फुले–शाहू–आंबेडकरांचे असून गोरगरीब, कष्टकरी व झोपडपट्टीतील नागरिकांपर्यंत विकास पोहोचवणे हाच काँग्रेसचा आत्मा आहे. पाणी, वीज, पक्की घरे व मूलभूत सुविधा देण्याचे काम काँग्रेसच पूर्ण करू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे शहरात भाजपचे शंभर नगरसेवक असतानाही शहराची ओळख गुन्हेगारीशी जोडली जात असल्याचे नमूद करत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. कोणत्याही आमिषाला बळी न पडता काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जाहीर सभेस माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, जुबेर भाई शेख, मधुकर चांदणे, बाळू कसबे, पप्पू माने राजू भरगुडे मारुती जाधव इम्तियाज शेख इमरान शेख सुरज माने नवाज शेख सलीम सय्यद काळूराम हांडे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप सत्तेत असूनही विकास नाही; काँग्रेसच सर्वसामान्यांचा आवाज – रमेश बागवे
Date:

