पुणे, दि.१२: स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल येथे शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी लाल महालातील राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा यांच्या शिल्पालाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमात प्रशांत मते, मेघना तरवडे, वैशाली अफूवाले, प्रकाश ढमढेरे, संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याप्रसंगी सांगितले की, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जे संस्कार केले, त्यामुळे महाराष्ट्राला आणि देशाला स्वतःची अस्मिता आणि ओळख मिळाली. जिजाऊंच्या कार्यामुळे पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला गेला आणि शाहिस्तेखान, मोगलांना धडा शिकवण्याचे काम झाले. यामुळे पुणे शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून नावारूपास आले. राजमाता जिजाऊ यांचे या सर्व घटनांमध्ये अपार योगदान आहे.

