जिल्हाधिकाऱ्यांनी फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
पुणे, दि. १२: ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेत आंतराष्ट्रीय पातळीवरील नामंवत सायकलपट्टू सहभागी होणार आहे, त्यांचे क्रीडा कौशल्य प्रत्यक्ष बघण्याची आपल्या संधी मिळणार आहे, त्यांच्यापासून आपल्या देशातील अधिकाधिक खेळाडूनी प्रेरणा घेत ऑल्मिपिक स्पर्धेत सहभागी होण्याकरिता पात्र होतील, अशा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला, अशा नामवंत सायकलपट्टूचे क्रीडा कौशल्य बघण्याची संधी गमावू नका, असे आवाहन त्यांनी केले.
फर्ग्यूसन महाविद्यालयात विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना श्री. डुडी बोलत होते. यावेळी उप विभागीय अधिकारी यशवंत माने, प्राचार्य डॉ. श्याम मुडे, उपप्राचार्य डॉ. राधिका जाधव, डॉ. प्रकाश पवार आदी उपस्थित होते.
‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेबाबत माहिती देवून श्री. डुडी म्हणाले, या स्पर्धेच्या माध्यमातून पर्यटनाच्यादृष्टीने असलेल्या गड, किल्ले, धरणे, नद्या, ग्रॉस लँड, डोंगरांगा, जैव विविधता, वनसंपदा, प्राणी, संस्कृती त्याचबरोबर ऐतिहासिक, धार्मिकस्थळे आदीबाबी जगासमोर आणण्याकरिता प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांची आरोग्यदायी जीवनशैली विकसित करण्यासोबत प्रदूषणावर उपाययोजना म्हणून सायकलीचा वापर; त्यामध्यामातून पर्यावरण सरंक्षणाच्यादृष्टीने स्पर्धा महत्वपूर्ण आहे.
संपूर्ण स्पर्धा चार टप्पात होणार असून स्पर्धेच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात येत असून ती अंतीम टप्प्यात आहे. पुणे जिल्ह्याचे वैभव जागतिक पातळीवर पोहचविण्याची संधी आहे. स्पर्धा मार्गाच्या दोन्ही बाजूला उभे राहत महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास, संगीत, वेशभुषा, नाटक, लोकनाट्य आदी माध्यमाद्वारे खेळाडूंचे स्वागत करावे तसेच उत्साह वाढवावा. असे करतांना स्पर्धेला अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, याअनुषंगाने सर्व संबंधित महाविद्यालयांना स्वयंसेवक मार्गदर्शनही करणार आहे. त्यादृष्टीने प्राचार्य, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सायकल स्पर्धा बघण्याकरिता प्रोत्साहित करावे.
विद्यार्थ्यांने किमान एकतरी खेळ खेळला पाहिजे, खेळामुळे आरोग्य सदृढ राहण्यासोबत वैचारिक जडणघडण होते. संघभावना वाढीस लागते. खेळाचे महत्व विचारात घेता अधिकाधिक विद्यार्थी, खेळाडू, नागरिकांनी ही स्पर्धा बघण्याकरिता यावे, आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही बघण्यास सांगावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले.
कार्यक्रमानंतर ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ बाबत माहिती देणारी चित्रफित दाखविण्यात आली.

