पुणे.दि.१२: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना आक्रमक झाली असून, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोंढवा परिसरातील विविध प्रभागांत उत्साही प्रचार कार्यक्रम राबवण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचाराला भरघोस पाठिंबा व्यक्त केला.दि. ११ जानेवारी रोजी, प्रभाग १९ (कोंढवा खुर्द-कौसर बाग) मध्ये तस्मीन पटेल, जहीर शेख आणि जुनेद शेख यांच्या प्रचारार्थ ज्योती हॉटेल चौक ते कौसर बाग, शीतल पेट्रोल पंप कोंढवा पर्यंत रॅली काढण्यात आली. डॉ. गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील ही रॅली मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सहभागाने यशस्वी झाली.
त्याचबरोबर प्रभाग ४० (कोंढवा बु.-येवलेवाडी) मध्ये संगीता ठोसर आणि पुष्पा मेमाणे यांच्या निवडणूक कार्यालयाला डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळीही मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवून प्रचारात सहभाग घेतला.प्रभाग ४१ (महमंडवाडी-उंड्री) मध्ये सारिका पवार, प्रमोद भानगिरे, स्वाती टकले आणि मच्छिंद्र दगडे यांच्या प्रचारार्थ ओरिएंट पॅलेस येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली. सभेला संबोधित करताना डॉ. गोऱ्हे यांनी चारही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील, असा दावा केला.
या सभेत डॉ. गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाना भानगिरे यांच्या प्रभागातील विशेष लक्ष आणि शिवसेनेची ओळख अधोरेखित केली. “शिंदे साहेबांनी लोकहिताचे जे निर्णय घेतले आहेत, त्याची प्रसिद्धी समाज माध्यमातून आणि भेटीगाठींतून करावी, जेणेकरून लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचेल,” असे आवाहन त्यांनी केले.
नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील रस्ते, ड्रेनेज लाईन आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर नागरिकांना विचारात घेऊन आराखडा तयार करण्याचे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी दिले. “या प्रभागात विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे,” असे ते म्हणाले.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, कोंढवा परिसरात पक्षाची पकड मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे.

