पुणे- एका ६ वर्षांच्या मुलीला आठ महिने सतत खोकल्याचा त्रास होत होता. अनेक तपासण्या आणि उपचारांनंतरही आराम मिळत नव्हता. अखेर अंकुरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा केला, ज्याचे कारण तिच्या आईने वापरलेला परफ्युम ठरले.
आर्या पाटील (नाव बदलले आहे) या मुलीला सतत खोकला, रात्री झोपेत खोकल्याची उबळ आणि घशात खवखव जाणवत होती. छातीचा एक्स-रे आणि इतर तपासण्या सामान्य आल्या होत्या. अनेक डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करूनही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, ज्यामुळे तिचे पालक चिंतेत होते.
एका फॉलोअप तपासणीदरम्यान आर्याची आई डॉक्टरांशी बोलत असताना, जवळ उभ्या असलेल्या परिचारिकेला अचानक तीव्र खोकला येऊ लागला. चौकशीअंती परिचारिकेने सांगितले की आर्याच्या आईने वापरलेला परफ्युम खूप तीव्र आहे आणि त्यामुळेच तिला खोकला येत आहे.
या निरीक्षणामुळे डॉक्टरांना खऱ्या कारणाचा अंदाज आला. आई दररोज वापरत असलेल्या तीव्र परफ्युमच्या सुगंधामुळे आर्याच्या श्वसनमार्गाला त्रास होत होता. डॉक्टरांनी तात्काळ मुलीच्या आसपास परफ्युम वापरणे बंद करण्याचा सल्ला दिला. हा बदल केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत आर्याचा खोकला जवळजवळ पूर्णपणे बरा झाला.
अंकुरा हॉस्पिटलचे बालरोग फुफ्फुसविकार व ॲलर्जी तज्ज्ञ डॉ. मौनीश बालाजी यांनी सांगितले की, तीव्र परफ्युम, एअर फ्रेशनर, अगरबत्ती आणि एरोसोल स्प्रे यामुळे काही मुलांना दीर्घकाळ खोकला येऊ शकतो. वैद्यकीय कारण आढळत नसल्यास पर्यावरणीय घटकांचाही विचार करणे आवश्यक आहे. एका साध्या बदलाने मुलीचे आरोग्य सुधारल्याने पालकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

