पुणे-मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने 2 दिवस पुण्यात येण्याची परवानगी दिली आहे. यामुळे त्याला या निवडणुकीत आपल्या पत्नीचा प्रचार करता येणार आहे.पुणे महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली आहे. त्याची पत्नी कोथरूड भागातून निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. पण गजा मारणेवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे पुणे पोलिसांनी त्याच्यावर जिल्हाबंदी घातली होती. यामुळे त्याला पत्नीचा प्रचार करता येत नव्हता. अखेर गजा मारणेने या बंदीविरोधात मुंबई हायकोर्टात दाद मागितली होती. हायकोर्टाने आज त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना त्याला 15 व 16 जानेवारी असे दोन दिवस पुण्यात जाण्याची परवानगी दिली.
पुणे महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित होणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही दिवस गजा मारणेला आपल्या कुटुंबीयांसोबत घालवता येणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे गजा मारणे सध्या त्याच्या मुळशीतील घरात राहतो. त्याच्यावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ याच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. पण निवडणुकीच्या तोंडावरच त्याला जामीन मंजूर झाला होता. पण त्यानंतर त्याला पुणे जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली होती.
गजा मारणेने पुण्यातील काही वैयक्तिक व कायदेशीर कारणांसाठी शहरात येण्याची परवानगी मागितली होती. त्याच्या अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने पोलिसांच्या निगराणीखाली व कायदा सुव्यवस्थेला धक्का न लागण्याच्या अटीवर त्याला पुण्यात येण्यास हिरवा कंदील दाखवला. या कालावधीत गजा मारणेला कोणतीही सार्वजनिक सभा घेता येणार नाही. आपल्या समर्थकांशी संपर्क साधून शक्तिप्रदर्शन करता येणार नाही. त्याला वेळोवेळी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे.

