लाडक्या बहिणींना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज , बेस्टमध्ये महिलांना 50 टक्के सवलत,
मुंबई, दिनांक ११ जानेवारी २०२६
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पार्टी-शिवसेना-रिपाईंच्या महायुतीच्या वचननाम्याचं प्रकाशन रविवारी, ११ जानेवारी रोजी वांद्रे येथील एमसीएमध्ये करण्यात आलं. या वचननाम्यात मुंबईकरांसाठी आगामी काळातील विकासकामे आणि आश्वासनांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी मंचावर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय मंत्री आणि रिपाईं अध्यक्ष श्री. रामदास आठवले, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. विनोद तावडे, राज्याचे सूचना तंत्रज्ञान (IT) आणि सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष श्री. अमीत साटम, खासदार मिलींद देवरा, खासदार राहुल शेवाळे, आमदार योगेश कदम, रिपाईं नेते आणि प्रवक्ता अविनाश महातेकर तसेच महायुतीच्या सर्व पक्षांचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई भाजपा अध्यक्ष श्री अमीत साटम यांच्या प्रास्ताविक भाषणाने वचननामा प्रकाशनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. ते म्हणाले, “आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपाचा या संकल्पनेअंतर्गत मुंबईकरांच्या सुचना या वचननाम्याकरता मागवण्याची मोहीम मागचे २ महिने राबवण्यात आली होती. यात सुमारे २ लाख ६५ हजार सुचना या मुंबईकरांनी मुंबई विकासाकरता आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पाठवल्या होत्या. या सुचनांच्या आधारे महायुतीचा वचननामा, मुंबईकरांचा वचननामा, मुंबईकरांचा संकल्पनामा आम्ही तयार केला आहे.”
मुंबईसाठी महायुतीच्या वचननाम्यातील मुद्दे- मुंबईला पाणीपुरवठा पुढील 5 वर्षात गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार – पर्यावरण संवर्धन योजनेमार्फत 17 हजार कोटी रुपये – बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार – सर्व भाजी मंडईचे नुतनीकरण आणि पुर्नविकास करणार – फिश इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सेंटर स्थापन करण्यात येणार – लघु उद्योग धोरण राबवले जाणार – पुर्नविकासाला जलदगती देणार, पागडीमुक्त मुंबई आणि फनेल झोनप्रश्नी योजना राबवणार – बेस्टमध्ये 2029 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस – बेस्टमध्ये महिलांना 50 टक्के सवलत – बेस्ट बसेसची संख्या 5 हजारवरुन 10 हजारांवर जाणार – स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरची उभारणी करणार – लाडक्या बहिणींना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज – रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबई करणार – पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार – मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करणार – बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्ताने मराठी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम – पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाची स्थापना करणार – हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारणार – रविंद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर अन्य नाट्यगृहांचा पुर्नविकास करणार – विकसित मुंबईसाठी 2034 चा आराखडा तयार होणार
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला या वचननाम्यातील सर्व महत्त्वाचे मुद्दे मांडले. “गेल्या काही वर्षात मुंबईतील मराठी माणूस हा उपनगरात गेला आहे. त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पुनर्विकास राबवताना येणारे अडथळे दूर केले आहेत. एसआरए, म्हाडाच्या इमारती, सेसच्या इमारती, नॉन सेसच्या इमारतीचा निर्णय घेतला आहे. पाणीपट्टीत दरवर्षी ८ टक्के वाढ होते ती आम्ही पाच वर्षासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईला प्रदूषण मुक्त करण्याचं काम केलं आहे. मुंबई खड्डे मुक्त करणार आहोत. आम्ही फक्त वचननामा मांडून थांबणार नाही तर त्याची अंमलबजावणीही करणार आहोत.” असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या मुलमंत्राच्या माध्यामातून आरोग्य, शैक्षणिक आणि त्याच बरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना वर्षभरात राबवल्या जातील. बाळासाहेबांना जे अभिप्रेत होतं ते या सर्व योजनांमध्ये असेल. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाही वचननामा पाहिला पण त्यांना या सगळ्याचा विसर पडलेला दिसत आहे. त्यांच्या वचननाम्यात या सगळ्याचा उल्लेखही नाही. बाळासाहेब ठाकरे, मराठी भाषा, हिंदुत्व यातल्या कशाचाही उल्लेख नाही. पण आम्ही आमच्या वचननाम्यात या सगळ्यांचा विचार केलेला आहे. हा आमचा विकासनामा आहे आणि आम्ही वचन पाळणारे आहोत. याशिवाय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ उभारण्यात येईल. “
यानंतर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तरितपणे वचननाम्याचे मुद्दे समजावून सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “महायुतीचा वचननामा आज तुमच्यासमोर ठेवत आहोत. मागच्या काही वर्षांत आम्ही फक्त मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हातच घातलेला नाही तर हे प्रश्न सुटूही शकतात असा आत्मविश्वास मुंबईकरांच्या मनात निर्माण केला आहे. त्यामुळे इतर कुणीही वचननामा दिला तरी त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये असलेल्या अंतरामुळे आम्ही वचननामा पूर्ण करू. जेव्हा पाच वर्षानंतर जनतेसमोर जाऊ तेव्हा या वचननाम्यावर आधारित ॲक्शन टेकन रिपोर्ट हा फॅक्टशीट म्हणून मांडू आणि काय केलं, काय करणार आहोत आणि काय बाकी आहे हे सांगू.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही डीम कनव्हेन्सचे विषय सोडवले आहेत. जागा फ्रि होल्ड करण्याचं काम केलं आहे. हाईटच्या समस्या सोडवल्या आहेत आणि भविष्यात याला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईत राहणारा मराठी माणूस काहीही झालं तरी मुंबई सोडून जाणार नाही. मुंबईतच त्याला घरं देऊ हा संकल्प घेतला आहे. बीडीडीचाळ, पत्राचाळ, विशाल सह्याद्रीत हे करून दाखवलं आहे. काही लोकं केवळ मराठी माणसाच्या घराबद्दल बोलत असतात. आम्ही वचन पूर्ण करणारे आहोत. म्हाडाच्या लेआऊट्समध्ये रिडेव्हल्पमेंट करताना अधिकची जागा देत आहोत. सोबतच त्यात पारदर्शकता आणली आहे. तसेच धारावीचा विकास डीआरपी करणार आहे. यात शासन भागीदार असणार आहे. धारावीतील प्रत्येक पात्र व्यक्तीला कमीत कमी साडे तीनशे स्क्वेअर फुटाचे घर देणार आहोत. तिथल्या लघु उद्योग व्यवसायांना चांगल्या पद्धतीने इको सिस्टीम करून देणार आहोत. धारावीतील अपात्रांना हायकोर्टाचे आदेश न मोडता मार्ग काढून त्यांना घरं देणार आहोत. याशिवाय महापालिकेतील सफाई कामगारांनाही मालकी हक्काची घरे देणार आहोत. महापालिकेच्या प्रत्येक शाळेत मुलांना मराठी नीट शिकता आलं पाहिजे त्यासाठी मराठी लँग्वेज लॅब करणार आहोत.”
दरम्यान, महायुतीच्या जाहीरनाम्यात महिला आणि युवकांसह पायाभुत सुविधांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. राज्य सरकारच्या धर्तीवर लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी ५ लाखांच्या बिनव्याजी कर्जाची तरतूद करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसेच महायुतीच्या जाहीरनाम्यात युटिलिटी कॉरिडॉरसह मुंबईत सुरू असलेले सिमेंट काँक्रीटचे सर्व रस्ते पूर्ण करण्यावरही भर देण्यात आला आहे. तसेच मुंबईला प्रदुषणापासून वाचविण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी तब्बल १७ हजार कोटींचा निधी तसेच पर्यावरण प्राधिकरणाच्या स्थापनेचाही उल्लेख करण्यात आला आहे.

