पुणे : जुन्या वाड्यांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये वाडे व सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नावर शाश्वत उपाय म्हणून ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिली. प्रभाग २५ (शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई) परिसरात प्रचारार्थ नागरिकांशी संवाद फेरीदरम्यान ते बोलत होते.
प्रभाग २५ मध्ये मोठ्या प्रमाणावर जुने वाडे व सोसायट्या असून त्यांच्या पुनर्विकासासंबंधी अनेक अडचणी आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या कामांसाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. पुनर्विकासासाठी लागणारा कायदेशीर सल्ला, आवश्यक कागदपत्रे तसेच त्यासंबंधी मार्गदर्शन देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे बाप्पु मानकर यांनी सांगितले. या कक्षाच्या माध्यमातून पुनर्विकासासाठी लागणारा कायदेशीर सल्ला, आवश्यक कागदपत्रांची माहिती, कायदेशीर मदत तसेच सोसायट्यांच्या मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेन्स) प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा अनेक ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रभाग २५ मधून राघवेंद्र बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित हे निवडणूक लढवत आहेत. रविवारी हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. तसेच, रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने शनिवार पेठ, नारायण पेठ व बुधवार पेठ परिसरात पदयात्राही काढण्यात आली.

