पुणे : लडाख, कारगील या केवळ भारताच्या सीमा नसून भारताची आत्मा आहे. लडाखमध्ये राहणारी व्यक्ती एकटी नसून संपूर्ण भारत तिच्यात सामावलेला आहे. त्यामुळे भारताशी लडाख, कारगिलचे नाते कायमच अतूट आहे, असे प्रतिपादन लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी केले.
सरहद, पुणेच्या वतीने लडाख फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत कारगील गौरव नॅशनल अवॉर्ड २०२५ हे विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना कविंदर गुप्ता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, लडाखच्या प्रथम नागरिक बिंदु गुप्ता, सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, सौ .सुषमा नहार, अर्हम इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश पगारिया, संवाद फाउंडेशनचे संजीव शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोकरे, मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, ज्येष्ठ आर्किटेक्ट दिलीप काळे, सामाजिक कार्यकर्ते राज देशमुख, निर्भय भारत फाउंडेशनचे संचालक तरुण उत्पल, राज्यशासनाचे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कविंदर गुप्ता यांचा खास पुणेरी पगडी, शाल, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन विशेष गौरव करण्यात आला.
कविंदर गुप्ता पुढे म्हणाले, लडाख भावनात्मकतेने भारताशी अखंड जोडलेला आहे. भौगोलिकदृष्ट्या हिवाळ्यामुळे हा भूभाग काही काळ विलग झाला तरी भारताशी लडाखचे नाते अतूट आहे. लडाखच्या सीमाक्षेत्रात विकासाची अनेक कामे सुरू असून शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रांचा विकास होतो आहे. सरहद सारख्या संस्थांचे त्यातील योगदान फार मोलाचे आहे. मी राज्यपाल होताच प्रथमतः कारगील येथील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या बलिदानाला नमन केले. कारण राष्ट्राची रक्षा केवळ युद्धसीमेवर होते असे नाही तर नागरिकांच्या सहभाग व सहयोगावर होते. कोणत्याही स्वार्थाशिवाय या नागरिकांनी कारगील युद्धात आपल्या सैन्याला मोठी मदत केली. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात सध्या जे ऐतिहासिक परिवर्तन सुरू आहे ते आपण सारे पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे लष्कराचे मनोबल उंचावले आहे. सीमाक्षेत्रांचा विकास होत असून तिथे आवश्यक सुविधा मिळत आहेत. केवळ सुरक्षेच्या दृष्टीने नाही तर सन्मान व विकासाच्या दृष्टीने लडाख व कारगीलकडे पाहिले जाते आहे याचा आनंद आहे.
पुलकुंडवार म्हणाले, जम्मू-काश्मीर, लडाख हे भूभाग देशाचा सन्मान आहेत. देशातील प्रत्येक नागरिलाला त्याचा अभिमान आहे. ‘सरहद’च्या माध्यमातून अनेक वर्षे तिथे जे सातत्यापूर्ण काम होते आहे ते अद्वितीय आहे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. विस्तारवादाचा धोका येणाऱ्या काळात वाढत जाणार असल्याने देशातील नागरिकांनी एकत्र येऊन उभे राहणे गरजेचे आहे. आपण एक आहोत ही भावना प्रबळ करण्यासाठी आपण काश्मीर, लडाखमध्ये सातत्याने जायला हवे.
प्रास्ताविक करताना संजय नहार यांनी सरहदच्या वाटचालीचा आढावा घेतला ते म्हणाले, सरहदने गेल्या अनेक वर्षांपासून सीमावर्ती भागात चांगले काम केले आहे. हे काम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार आहे. लवकरच पुण्यामध्ये लडाख भवन आणि कारगील भवन उभारण्यात येणार आहे. मिनी काश्मीर उभे करण्याचाही प्रयोग पुण्यात सुरू आहे.
शमिमा अख्तर या काश्मिरी युवतीने सादर केलेल्या माझे माहेर पंढरी, वंदे मातरम या गीतांना लोकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. या वेळी जम्मू काश्मीर व लडाखच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपले प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले. सरहदचे विश्वस्त शैलेश वाडेकर यांनी आभार मानले.

पुणे ही राष्ट्रनिर्माणाची प्रयोगशाळा : कविंदर गुप्ता..
पुणे हे केवळ शिक्षण आणि संस्कृतीचे केंद्र नाही तर ती राष्ट्रनिर्माणाची प्रयोगशाळा आहे, असे मत लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, सरहदच्या माध्यमातून जम्मू काश्मीर व लडाख येथे सातत्याने विविध उपक्रम सुरू असतात, त्यामुळेच लडाख व पुण्याचे नाते ह भौगोलिक नाही तर भावनिक आहे, असे ते म्हणाले.


