पुणे.दि.११: शिवसेना पक्षाने पुणे महानगरपालिकेत भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जनतेने कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वतंत्रपणे मतदान करावे, असे आवाहन शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.
दि. १० जानेवारी रोजी, नागपूर चाळ येथे फुलेनगर-नागपूर चाळ प्रभागा मधील शिवसेना उमेदवार डॉ. रिंकू मोरे, विजयकुमार ढाकणे, सविता नाईक आणि विपुल दळवी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या . यावेळी गायत्री भागवत, शैलेंद्र मोरे, डॅनियल मगर, भानुदास बावस्कर, राजकुमार ढाकणे, सुजित परदेशी आदी उपस्थित होते. यादरम्यान, रेश्मा शेख, अलिशा शेख, प्रगती दोडके, अर्चना लोखंडे या भगिनींनी डॉ. गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लाडकी बहीण योजने मुळे महिलांना मोठी मदत झाली आहे. महिलांचा सन्मान हा महिलांचा अधिकार असल्याची भूमिका शिवसेनेने नेहमीच घेतली आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
शिवसेना सत्तेत आल्यास दोन लाख महिलांना लखपती बनवण्यासाठी सहकारी तत्त्वावर उद्योगभवन उभारले जाईल. नोंदणीकृत महिला बचत गटांना मनपातर्फे दरवर्षी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुढील १० वर्षांत सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून प्रत्येक झोपडीधारकाला ५५० चौरस फुटांचे मोफत घर दिले जाईल. तसेच मनपा शाळांमध्ये कॉम्प्युटर आणि ए आय शिक्षण सुरू केले जाईल. मुलींना मोफत शिक्षण, इ-लर्निंग शाळा वाढवणे आणि पीएमपीएमएल बसमध्ये महिलांना अर्धे तिकीट भाडे अशी आश्वासनेही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.
मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण आणि फळा चिन्हासमोरील बटण दाबून प्रभाग क्र.२ मधील उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

