मंत्रालयाचे उपहारगृह हे सध्या केवळ पोट भरण्याचे ठिकाण न राहता, खाद्यसंस्कृतीचे एक समृद्ध केंद्र बनले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत उसळणाऱ्या कढईतून दरवळणारा खमंग सुगंध आणि ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांचा आपुलकीने केलेला स्वीकार—येथील रोजच्या निरनिराळ्या स्वादिष्ट पदार्थांतून मनाला भारावून टाकतो.
मंत्रालय म्हटले की, डोळ्यांसमोर उभे राहते ती अखंड धावपळ, टेबलावर रचलेल्या फायलींचे ढिग, वरिष्ठांचा कामाचा तगादा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटलेली घाई. अशा या तणावग्रस्त वातावरणातून जेव्हा एखादा अधिकारी, कर्मचारी किंवा अभ्यागत मंत्रालय उपहारगृहाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवतो, तेव्हा काही क्षणांतच चेहऱ्यावरील ताण विरघळून जातो.
दरवळणाऱ्या भोजनाचा सुगंध आणि फोडणीचा खमंग वास जणू थकलेल्या मनाला दिलेली हाक ठरतो—आणि नकळत चेहऱ्यावर हास्य उमलते.
मंत्रालयात नियमित येणारे अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागत यांच्यासाठी स्नेह, प्रेम, आपुलकी आणि आत्मीयता टिकवून ठेवण्याचा वसा येथील उपहारगृहातील कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. माणसाच्या हृदयात जाण्याचा मार्ग हा पोटातून जातो—हे त्यांनी अचूक ओळखले आहे. त्यामुळेच रोज नवनव्या, चवदार आणि रुचकर पदार्थांची रेलचेल येथे पाहायला मिळते.
वाफाळलेला बटाटावडा, कांदा भाजी, बटाटा भजी ताटात पडताच भूक चाळवते. इथले कांदापोहे म्हणजे जणू तृप्तीचा ढेकरच! पिवळधमक, खमंग ढोकळ्यावर पेरलेली हिरवीगार कोथिंबीर, मिरची आणि ओल्या खोबऱ्याची पखरण—डोळ्यांनाही सुखावणारी.
सुकी-ओली भेळ, आळूवडी, पकोडा ब्रेड, झणझणीत मिसळ-पाव हे सारे जिभेचे लाड पुरविणारे पदार्थ आहेत.
मंत्रालय उपहारगृहातील हे दृश्य म्हणजे डोळ्यांना आणि जिभेला मिळालेली एक अविस्मरणीय मेजवानीच.
लाडू हा गोडवा आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. पाहताच मन मोहून टाकणाऱ्या लाडूंचे विविध प्रकार येथे रोज चाखायला मिळतात—बुंदीचे, तिळाचे, चूर्म, बेसन, मेथी, रवा लाडू…
त्यासोबत गाजर हलवा, दुधी हलवा, मावा बर्फी, मोहनथाळ, खाजा, गुलाबजाम, खोबऱ्याची वडी—मिष्ठानांची जणू रेलचेलच असते. हे सारे पदार्थ वाजवी दरात, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत. थंडगार कोकम सरबत आणि ताक अधूनमधून शरीरासह मनाचाही थकवा घालवते.
मात्र या सर्व स्वादांच्या मागे अदृश्य मेहनत असते—जी अनेकदा नजरेस पडत नाही.
या मेहनतीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मंत्रालय उपहारगृहाचे कर्तव्यनिष्ठ वरिष्ठ व्यवस्थापक हिमंतराव नथुराम पंड्या. मूळचे राजस्थानचे असलेले पंड्या यांनी वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागी पाणी देणारा वेटर म्हणून १९८७ साली मंत्रालयाच्या चौरस आहार उपहारगृहात सेवेला सुरुवात केली.
अनेक छोटी-मोठी कामे करत, प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी आजच्या पदापर्यंत मजल मारली.
राजस्थानी खाद्यसंस्कृतीची उत्तम जाण असल्यामुळे त्यांनी मंत्रालयात येणाऱ्या लोकांची रुची ओळखून नवनव्या पाककृती आत्मसात केल्या. गेली अनेक वर्षे मिळणाऱ्या एकसुरी पदार्थांपासून त्यांनी सर्वांची सुटका केली. मेहनती, कर्तव्यनिष्ठ आणि कामात प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून हिमंतराव पंड्या यांची मंत्रालयात ओळख आहे.
जानेवारी २०२६ मध्ये ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मंत्रालय उपहारगृहाची खाद्यसंस्कृती अधिक समृद्ध झाली—याची नोंद कायमस्वरूपी घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे.
या उपहारगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे पदाची श्रीमंती आणि कामाचा व्याप काही काळ विसावतो. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर सही करणारी लेखणी इथे चहाच्या पेल्यात साखर विरघळताना शांत होते.
गंभीर चर्चांपासून दूर, अधिकारी वाफाळत्या चहाच्या घोटासोबत सहकाऱ्यांशी हास्यविनोद करताना दिसतात. फायलींच्या ओझ्याखाली थकलेली मनं येथे काही काळ विसावतात.
दूरवरून आलेल्या पाहुण्यांसाठी हे उपहारगृह केवळ खाण्याचे ठिकाण न राहता, ‘स्वादिष्ट आणि चविष्ट आहार..म्हणजे मंत्रालयाचा आपुलकीचा पाहुणचार’ अनुभवण्याचे केंद्र बनले आहे.
“मंत्रालयात काम झालं की नाही माहीत नाही, पण इथलं भोजन घेऊन मात्र तृप्त झालो,” अशी प्रतिक्रिया अनेकांच्या ओठांवर उमटते.
हीच त्यांच्या कामाची खरी पावती—जी खूप काही सांगून जाते.
लेख : खंडूराज गायकवाड
📧 khandurajgkwd@gmail.com
📞 संपर्क : ९८१९०५९३३५
मंत्रालयाचे उपहारगृह : खाद्यसंस्कृतीचे आहार केंद्र…!
Date:

