पुणे:
महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तर, त्याचे खापर आपल्यावर फुटेल, या धास्तीने केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ घाबरले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पुणे निवडणूक प्रभारी, आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी मोहोळ यांच्यावर केली.गुंड नीलेश घायवळ याला पारपत्र देण्याच्या विषयावरून मोहोळ यांनी अजित पवार यांना चॅलेंज दिले आहे. दादांना कशाला चॅलेंज करता, गुंडाच्या पारपत्रासंदर्भात मीच तुमच्याशी बोलायला तयार आहे, अशी टिप्पणीही रोहित पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारासाठी वारजे परिसरात आले असताना पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मोहोळ यांच्यावर टीका केली.
‘कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. याबाबतच अजित पवार हे आपली भूमिका मांडत होते. भाजपकडून शहरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्प, विविध प्रकारच्या व्यवसायांना अडचण आणण्याचे काम केले जात आहे. धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोपही पवार यांनी केला.
ते म्हणाले, ‘भाजपमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहराची अक्षरशः वाताहत झाली आहे. शहराचा ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी विकास करायला पाहिजे होता, तसा केला नाही. बांगड्या भरल्या नाहीत, असे आमदार महेश लांडगे भाषणात सांगतात. त्यातन ते महिलांचा अपमान करत असल्याचे दिसत आहे. आमदार लांडगे यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर येऊ लागला आहे. त्यामुळेच लांडगेही घाबरले आहेत.’
‘मोहोळ यांचा दिल्लीमध्ये चांगला संपर्क वाढला आहे. त्यांच्या या संपर्क वाढीतूनच त्यांचा नेमका कोणी गेम केला, हे सुद्धा आम्ही सांगू शकतो, अशी टिप्पणीही रोहित पवार यांनी केली.

