एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ‘भयमुक्त, वाहतुककोंडीमुक्त आणि समृद्ध पुणे’चे वचन; डॉ. नीलम गोऱ्हेंकडून ‘शब्द शिवसेनेचा’ या वचननाम्याची सविस्तर माहिती
पुणे.दि.९: शिवसेना पक्षाने पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी आपला ‘शब्द शिवसेनेचा’ हा वचननामा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित केला. त्याबाबत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या भाषणात सविस्तर माहिती दिली.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “पुणे शहर विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करून ‘पुणे विकास परिषद’ आयोजित करणार आहोत. यासाठी भरीव निधी उपलब्ध करून घेऊन शहराला नवे रूप देऊ.”
शिवसेनेच्या ‘शब्द शिवसेनेचा’ या वचननाम्यातील प्रमुख घोषणा खालीलप्रमाणे आहेत:
- वाहतूक समस्या संपुष्टात: पुणे शहराला वाहतूक कोंडीपासून मुक्त करण्यासाठी एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करणार.
- भयमुक्त पुणे: गुन्हेगारी पार्श्वभूमीला नेस्तनाबूत करून शहराला पूर्णपणे सुरक्षित बनवणार.
- महिला सक्षमीकरण: दोन लाख महिलांना लखपती बनवण्यासाठी सहकारी तत्त्वावर उद्योगभवन उभारणार. तसेच नोंदणीकृत महिला बचत गटांना मनपातर्फे वर्षाला ५० हजार रुपयांची मदत.
- झोपडपट्टी पुनर्वसन: पुढील १० वर्षांत सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन; प्रत्येक झोपडीधारकाला ५५० चौरस फुटांचे मोफत घर.
- आरोग्य सुविधा: मनपाच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजी लॅब उभारणार.
- शिक्षण आणि रोजगार: मनपा शाळांमध्ये कॉम्प्युटर व ए.आय. शिक्षण सुरू करणार, इ-लर्निंग शाळा वाढवणार. ऑटोमोबाईल व ए.आय. इंजिनिअरिंग कॉलेज काढणार.
- मेट्रो वाहतूक विस्तार: पुणे मेट्रोचे जाळे लोणावळा, दौंड, खेड-शिवापूर, खडकवासला आणि विमानतळापर्यंत नेणार.
- क्रीडा आणि संस्कृती: बालेवाडी-म्हाळुंगे येथील श्री शिव छत्रपती क्रीडा नगरीत दरवर्षी भव्य क्रीडा महोत्सव. मराठी संगीत रंगभूमी संग्रहालय आणि लता मंगेशकर स्मृतीसाठी लता वाटिका व ओपन आर्ट गॅलरी उभारणार.
- नदी सुधार आणि पर्यटन: मुठा नदी सुधार योजना जायका*च्या मदतीने विक्रमी वेळात पूर्ण करणार. गणेशोत्सवाला *ग्लोबल गणेशोत्सव बनवून पर्यटन आणि रोजगार वाढवणार.
- इतर प्रमुख योजना: जुन्या वाड्यांतील भाडेकरूंनाही एफएसआय देणार, वाडे दुरुस्तीसाठी विशेष निधी; पुण्याजवळ रेल्वे कार्गो हब आणि ऑटो हबसाठी विशेष प्रयत्न.
यासह इतरही गोष्टींचा समावेश या वचननाम्यात करण्यात आला आहे.

