पुणे.दि. ८: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रचारार्थ नऱ्हे-वडगाव बु.-धायरी आणि येरवडा-गांधीनगर भागात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत कदम यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून महापालिकेत भगवा फडकविण्याचे आवाहन केले.
प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे-वडगाव बु.-धायरीमध्ये शिवसेना उमेदवार गिरमे निलेश दशरथ, गिरमे राधिका दशरथ, सुप्रिया ईश्वर भूमकर आणि तांबे विठ्ठल ज्ञानेश्वर यांच्या प्रचारासाठी ७ जानेवारी रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील कालभैरव मंदिर चौक, नऱ्हे रोड येथे सभा झाली. तसेच प्रभाग क्रमांक ६ येरवडा-गांधीनगरमध्ये उमेदवार किशोर चंद्रकांत वाघमारे, वाघचौरे कोमल अभिजीत, स्नेहल सुनील जाधव आणि आनंद रामनिवास गोयल यांच्या प्रचारार्थ गाडीतळ येरवडा येथे ही सभा घेण्यात आली. यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, युवासेना प्रदेश सचिव किरण साळी, उपनेते इरफानभाई सैय्यद, निलेश घारे आदी मान्यवर उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, समाविष्ट गावे पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमी सामान्य लोकांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना या गावांच्या विकासासाठी महापालिकेत पाठवणे गरजेचे आहे. नगर विकास खात्यासह महत्त्वाची खाती शिवसेनेकडे असल्याने शहराच्या विकासाला गती मिळेल. सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करून पुणे महापालिकेत भगवा फडकवा, असे आवाहन कदम यांनी केले.
शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, नऱ्हे गावातील पाण्याच्या पाईपलाइनसाठी मी निधी दिला होता, त्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. आता फिल्टरची मागणी आहे, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. समाविष्ट गावांच्या करमाफीचा मुद्दा मांडला आहे, मात्र प्रशासकामुळे दुर्लक्ष झाले आहे. नवे पोलीस स्टेशन योगेश कदम यांच्यामुळे सुरू झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. दिवसेंदिवस पुण्याला पाण्याची समस्या भीषण होत चालली आहे, त्यामुळे शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधणे गरजेचे आहे. ही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

