- विकसित गोवा २०३७च्या दिशेने गुणवत्ताधिष्ठित भरती; जीपार्ड (GIPARD) अंतर्गत विशेष प्रशिक्षण
पणजी, दि. ८ जानेवारी २०२६ : गोव्यातील प्रशासकीय सेवांमध्ये स्थानिक गुणवत्तेचा सहभाग वाढवणारा एक महत्त्वाचा टप्पा आज गाठण्यात आला. मंत्रालयातील कॉन्फरन्स हॉल येथे स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे निवड झालेल्या ९५ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. हा पहिल्या बॅचचा कार्यक्रम असून, संपूर्णपणे गुणवत्तेच्या (Merit-based) आधारावर भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सचिव कांडावेलू यांच्यासह माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, परेश फळदेसाई तसेच उत्तम पार्सेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘हा’ केवळ ९५ जणांसाठीच नव्हे, तर संपूर्ण गोव्यासाठी अभिमानाचा क्षण:-
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करताना सांगितले की, आजचा दिवस केवळ ९५ जणांसाठीच नव्हे, तर संपूर्ण गोव्यासाठी अभिमानाचा आहे. शासकीय सेवेत प्रवेश म्हणजे सत्ता नव्हे, तर जनतेची सेवा असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. “आम्ही सेवक आहोत, हे कायम लक्षात ठेवा. सर्वसामान्य माणसांच्या अडचणी सोडवणे हेच खरे काम आहे,” असे ते म्हणाले.
तळागाळातील तरुण आज अधिकारपदावर:-
OBC, SC आणि ST प्रवर्गातून या नियुक्त्या करण्यात आल्या असून RDA, PWD, सिव्हिल आदी महत्त्वाच्या विभागांमध्ये उमेदवारांची नेमणूक झाली आहे. केवळ मिळालेल्या पदावर समाधान न मानता, वरिष्ठ पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
‘नेकीने काम करा, प्रलोभनांपासून दूर रहा’, मुख्यमंत्र्यांचा सल्ला:-
गोव्यातील तरुण प्रतिभा आज प्रशासकीय सेवांमध्ये दाखल होत असल्याचा अभिमान व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही आमिषाला बळी पडून निलंबनाची वेळ येऊ देऊ नका. दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करताना विकसित भारत २०४७ आणि विकसित गोवा २०३७ या दृष्टीकोनातून काम करा.
‘जीपार्ड’ अंतर्गत विशेष प्रशिक्षण देणार:-
गतीशक्ती या प्लॅटफॉर्मअंतर्गत पुढील २५ वर्षांचा विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून, नियुक्त उमेदवारांना जीपार्ड (GIPARD) अंतर्गत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर टाळून पारदर्शक, प्रामाणिक आणि जनाभिमुख प्रशासन देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केले.

