जालना/ मुंबई, दि. ८ जानेवारी २०२६
अंबरनाथमधील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी कोणाशीही चर्चा न करता घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना सज्जड दम देत पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. काँग्रेसने कारवाई केली पण भाजपाने मात्र त्यांना पक्षात सामावून घेतले, यातून भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला आहे. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही पक्षाशी युती करत असून अकोटमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाशी भाजपाने युती केली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जालना येथे सभा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष भाजपा व शिंदेसेनेविरोधात लढला व १२ नगरसेवक निवडून आले पण भाजपाने अंबरनाथ विकास आघाडी करण्यासाठी पक्षाच्या लेटर हेडवर पत्र जारी केले आहे. काँग्रेसने तात्काळ कारवाई केली पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कोणतीही कारवाई केली नाही, केवळ एक विधान करून ते मोकळे झाले. भाजपाच्या कथनी आणि करणीत फरक आहे. अशी अभद्र युती करताना तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षात घेताना भाजपाला लाज वाटायला पाहिजे. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्याबद्दल जे वक्तव्य केले यातून त्यांना सत्तेचा माज आल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या विकासात विलासराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे, पण भाजपाला मात्र महाराष्ट्रासाठी योगदान दिलेल्या नेत्यांची नावे पुसुन टाकायची आहेत. शिवराज पाटील चाकूरकर, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे व शंकरराव चव्हाण यांचेही नाव भाजपाला पुसायचे आहे. नांदेडच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यासमोरच नांदेडमध्ये ७० वर्षात काहीही नियोजन केले नाही, विकास केला नाही हे सांगून अशोक चव्हाण यांच्या तोडांवरच ते नालायक आहेत हे सांगितले. भाजपाची मानसिकतता ओळखा, त्यांना शिव, शाहु, फुले व आंबेडकर यांचे विचारही पुसायचे आहेत, अशा अहंकारी भाजपाला जनतेने धडा शिकवावा, असेही सपकाळ म्हणाले..
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यात मोठ्या संख्येने सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक बिनविरोध होत आहेत हे काही त्यांची लोकप्रियता आहे म्हणून नाही, तर दमदाटी, धमक्या, पैशांचे आमिष दाखवून होत आहेत. बिनविरोधसाठी सत्ताधाऱ्यांना पोलीस, प्रशासन व निवडणूक आयोगही मदत करत असल्याचे दिसत आहे. हा बिनविरोधचा प्रकार अत्यंत घातक असून लोकशाही व संविधानावरचे मोठे संकट आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
या पत्रकार परिषदेला खासदार डॉ. कल्याण काळे, आ. राजेश राठोड, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राख, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

