कॉंग्रेस -भाजपा युती तोडली
मुंबई- अंबरनाथ नगपरिषदेसाठी भाजप आणि काँग्रेसची युती झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. ठाकरेंपासून शिंदेपर्यंत साऱ्यांनी भाजपवर आरोप केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अभद्र युती तोडण्याचे आदेश दिले. आता या राजकीय नाट्याचा दुसरा प्रसंग रंगला असून, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना आता भाजपने प्रवेश दिलाय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
अंबरनाथमध्ये काँग्रेसचे नेतृत्व करणारे प्रदीप नाना पाटील आणि त्यांच्यासह इतर ११ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. याची गंभीर दखल घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी या सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र, काँग्रेसच्या या कारवाईला जुमानता प्रदीप पाटील यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये प्रदीप नाना पाटील, दर्शना उमेश पाटील, अर्चना चरण पाटील, हर्षदा पंकज पाटील, तेजस्विनी मिलिंद पाटील, विपुल प्रदीप पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजीवनी राहुल देवडे, दिनेश गायकवाड, किरण बद्रीनाथ राठोड, कबीर नरेश गायकवाड यांचा समावेश आहे.
प्रदीप पाटील यांनी अनेक वर्षांपासून अंबरनाथमध्ये काँग्रेसचे संघटन मजबूत ठेवले होते. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशामुळे अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपची ताकद प्रचंड वाढली असून, काँग्रेसचे अस्तित्व संकटात आले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘काँग्रेससोबत युती करणार नाही’ असे स्पष्ट केले होते, मात्र नगरसेवकांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने तांत्रिकदृष्ट्या हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे.
या घडामोडींवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.”जर काँग्रेसने आपल्या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई केली, तर ज्या भाजप नेत्यांनी या नगरसेवकांना आघाडीचा प्रस्ताव दिला, त्यांच्यावर भाजपने अद्याप कारवाई का केली नाही?” असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.
सचिन सावंत यांनी अकोटमधील भाजप-एमआयएम युतीचा दाखला देत भाजपच्या नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी केली. यावरून स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदू महासभा आणि मुस्लिम लीगच्या युतीची आठवण होते. भाजप आणि एमआयएम पडद्याआड एकच आहेत, हे आता उघड झाले आहे. सत्तेसाठी तत्त्वे आणि विचार बाजूला ठेवणारा हा पक्ष आहे,” अशी टीका त्यांनी केली.
‘अंबरनाथमध्ये झालेल्या भाजप-काँग्रेस आघाडीबद्दल आम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो. तिथे पाहा काय होतंय ते. जे होतंय, ते विचारसरणेशी सुसुंगत नाही, याची जाण करून दिली होती. हा एकनाथ शिंदे खुर्चीसाठी लढत नाही. सत्ता मिळवण्यासाठी विचारधारेशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे म्हणत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी भाजपला घरचा आहेर तर दिलाच, सोबत आरसाही दाखवला. एकनाथ शिंदे यांनी आजतक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे पुढे यांनी ओवेसी आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युतींच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, ‘सत्ता मिळवण्यासाठी विचारधारेशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. स्थानिक पातळीवरील गणित, कार्यकर्त्यांची भूमिका आणि परिस्थिती पाहून कुठे एकत्र लढायचं आणि कुठे स्वतंत्र जायचं हे ठरवलं जातं. मात्र, काहीही करा आणि सत्ता मिळवा, हा आमचा विचार नाही. सत्ता आली किंवा गेली तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

