पुणे
सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गॅंग ऑफ ट्रेकर्स, पुणे मधील ७ ट्रेकर्सने रायगड जिल्ह्यातील चढाई करण्यास अवघड व मध्यम स्वरुपाचे असलेले एकूण १४ गड-किल्ले अवघ्या ५ दिवस व रात्री मध्ये मॅरेथॉन ट्रेक करत सर केले.
या मोहिमेमध्ये ट्रेकर्सने पहिल्या दिवशी कर्जत जवळील २०२३ मधील दरड दुर्घटना ग्रस्त इर्शाळवाडी येथील “इर्शाळगड” व गौरकमात गाव जवळील “किल्ले भिवगड” तसेच दुसऱ्या दिवशी रोहा तालुक्यातील उंच असा “अवचितगड”, बिरवाडी येथील “बिरवाडी किल्ला”, कोकणातील व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला “घोसाळगड” व “तळगड असे ४ किल्ले तसेच तिसऱ्या दिवशी माणगड तालुक्यातील लांब पल्याचा व खड्या चढाईचा “कुर्डुगड”, राजगडाच्या संरक्षणासाठी बांधलेला “मानगड किल्ला” व “पन्हाळघर किल्ला” असे तीन किल्ले तसेच चौथ्या दिवशी महाड तालुक्यातील गांधारपाले लेणी जवळील लांब पल्याचा अपरिचित असा “सोनगड किल्ला”, दसगाव येथील अपरिचित असा “दौलतगड किल्ला” व चांभारवाडी जवळील खडी चढाई असलेला “चांभारगड किल्ला उर्फ महेंद्रगड” असे तीन किल्ले तसेच पाचव्या आणि शेवटच्या दिवशी स्वराज्याची राजधानी, महाराष्ट्राचे वैभव व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असलेला श्रीमान “किल्ले रायगड” व परतीच्या वाटेवर रात्रीच्या वेळी सुधागड तालुक्यातील दाट जंगलाने वेढलेला व कातळात कोरलेल्या चित्तथरारक पायऱ्या असलेला “किल्ले मृगगड”दाट अंधारात सर करून एकूण १४ गड-किल्ले ७५० किलोमीटरचा कार ने प्रवास करून अवघ्या ५ दिवसामध्ये गॅंग ऑफ ट्रेकर्स च्या ७ शिलेदारांनी सर केले.
या मोहिमे मध्ये सातवी मध्ये शिकणाऱ्या आद्या बीजगर्णी व आराध्या चौथमल तसेच दहावीत शिकणाऱ्या कीर्ती बीजगर्णी व सृष्टी खेत्री तसेच या मोहिमेत इंजीनियरिंग चे शिक्षण घेणारा प्रणव नेसवणकर, नूतन महिला विकास शिक्षण मंडळ, कासेगाव, सांगली चे सेक्रेटरी श्री. विश्राम कुलकर्णी व ग्रुप लीडर व आयोजक अँड. सम्राट रावते यांनी सहभाग घेऊन “गड-किल्ल्यांच्या साथीने शारीरिक स्वास्थ्य” हा संदेश देत ही कठीण अशी मॅरेथॉन ट्रेक मोहिम अवघ्या ५ दिवसात यशस्वीरीत्या पूर्ण केली.
अश्या प्रकारे नाताळाच्या सुट्टी मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील अवघड व कठीण गड-किल्ले सलग सर करण्याचे गॅंग ऑफ ट्रेकर्सचे हे सलग ७ वे वर्ष आहे.

