चुकीचे पाणीवाटप, कचरा व्यवस्थापन नीट नाही–महापालिकेची बिघडलेली अवस्था दुरुस्त करू
पुणे-अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरी समस्यांवर बोट ठेवण्यासाठी ‘एक अलार्म, पाच कामे’ हे विशेष कॅम्पेन सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत एका रॅप सॉंगच्या माध्यमातून शहरातील खड्डे, कचरा, वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि पाणीटंचाई या पाच प्रमुख मुद्द्यांवरून प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली आहे. महापालिकेत मोजक्याच कंत्राटदारांना टेंडर दिले जात असल्यामुळे कामाचा दर्जा खालावला असून, त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांना सोसावा लागत असल्याचा आरोपही या मोहिमेद्वारे करण्यात आला आहे.
या संदर्भात स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले की, हे कॅम्पेन केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारापुरते मर्यादित आहे. या रॅप सॉंगचा केंद्र किंवा राज्य सरकारच्या कामकाजाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर रखडलेली विकासकामे आणि प्रशासकीय त्रुटींकडे लक्ष वेधणे हाच यामागचा मुख्य उद्देश असून, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर या माध्यमातून ‘अलार्म’ वाजवून टीका करण्यात आली आहे.
अजित पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरीमधील काम समोर आणण्यासाठी, दोन्ही महापालिका अपयशी ठरल्या आहेत. लोकांचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे गाण लाँच केले आहे. नागरिकांना आवाहन आहे की माझा जो प्रशासनातील अनुभव आहे, मी काम करतो. तुमचे सगळे प्रश्न सोडवून दाखवू. एक अलार्म लावू आणि लक्ष वेधून घेऊ. लोकांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत. तिथल्या लोकांना अलार्म कळला पाहिजे. समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. महत्त्वाच्या पाच गोष्टी दूर केल्याशिवाय नागरिकांना जीवन जगता येणार नाही, असे पवार म्हणाले.
पुणे आणि पिंपरी मध्ये नागरी समस्या खूप आहेत. अनेक प्रभागात रोड शो केला आहे. त्या त्या प्रभागातली उमेदवार सोबत होते. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आज त्याचे रुपांतर मतदानामध्ये झाले पाहिजे, असे आवाहन अजित पवारांनी केले आहे. पुणे आणि पिंपरीमध्ये नागरी समस्या आ वासून उभ्या आहेत. कचरा, आरोग्य सेवा, वाहतुकीची कोंडी, रस्त्यावर खड्डेच खड्डे आहे, पाण्याची अडचण आहे यावर काम करायचे आहे. टँकर माफियाची गँग आहे. कचरा वेळेवर उचलला जात नाही. रोज अनुभव आपल्या नागरिकांना येत आहे. कागदावर अनेक योजना आहेत. पुणे शहरातले नागरिक भरडले जात आहेत. चुकीचे पाणीवाटप केले जात आहे, कचरा व्यवस्थापन नीट नाही, असे पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सगळ्या गोष्टी कोलमडल्या आहेत. 12350 लोक पुणे स्वच्छ करण्यासाठी काम करतात. मात्र रस्त्यावर कचरा दिसत आहे. पुण्यात हवेची गुणवत्ता ढासळत आहे. प्रदूषित श्वास आपले लोक घेत आहेत. कुत्र्यांची नसंबंदी केली मात्र 20 हजार कुत्री लोकांना चावली आहेत. या सगळ्या समस्येतून पुणेकरांना बाहेर काढण्यासाठी आणि पुणे महापालिकेची बिघडलेली अवस्था दुरुस्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सहकारी पक्ष एक अलार्म 5 काम या संकल्पनेवर हा उपक्रम सूर करत आहोत, अशी माहिती पवारांनी दिली आहे.
-काम करुन पाठवण्याची आणि थांबलेली कामे सुरू करण्याची ताकद आमच्यात आहेत. एक अलार्म पाच कामे हा जाहीरनामा जाहीर करणार आहोत. 10 तारखेला जाहीरनामा तुमच्यासमोर आणू असे अजित पवार म्हणाले. नुसत्या उणिवा दाखवणार नाही तर आम्ही काय करू हे देखील सांगू. पुणेकरांना विश्वास देणार आहे. काही कामे करू हे देखील सांगू. पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिले जाते त्याचा फटका नागरिकांना बसतो असे अजित पवार म्हणाले.

