मुंबई-मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच वांद्रे (बांद्रा) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञाताने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोराने कुरेशी यांच्या पोटात थेट चाकू भोसकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हाजी सालीन कुरेशी हे बांद्रा येथील ज्ञानेश्वर नगर परिसरात आपल्या समर्थकांसह घरोघरी जाऊन प्रचार करत होते. यावेळी मतदारांच्या भेटीगाठी घेत असतानाच गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपीने अत्यंत क्रूरपणे कुरेशी यांच्या पोटात धारदार चाकू खुपसला आणि तिथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुरेशी यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने जवळच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले.
सध्या हाजी सालीन कुरेशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की यामागे काही वैयक्तिक कारण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. ‘मुंबईत महायुतीचाच विजय होईल’ असा चंग बांधून प्रचारात उतरलेल्या शिंदे गटाच्या उमेदवारावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
हाजी सलीम कुरेशी हे शिवसेना शिंदे गटाचे नेते असून, पूर्वी ते एमआयएम या पक्षात कार्यरत होते. मुंबई महापालिका निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनीही त्यांना उमेदवारी दिली असून, मुंबईतील प्रभाग क्रमांक ९२ मधून ते निवडणूक लढवत आहेत.

