पुणे-जागतिक मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती यांच्या विद्यमाने कला अकादमी पणजी येथे ९, १० व ११ जानेवारी रोजी, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ‘शोध मराठी मनाचा’ या २१ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमाची माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, कार्याध्यक्ष उदयदादा लाड, कार्यकारणीचे जयराज साळगावकर यांनी आज दिली.
दि.९ रोजी दुपारी. २ वाजता ‘चित्रपटातील मराठी माणूस’ या सत्राने संमेलनास सुरवात होईल. त्यात नामवंत अभिनेते चित्रपट दिग्दर्शक निर्माता महेश मांजरेकर यांच्याशी ब्रिटीश नंदी संवाद साधतील. त्यानंतर २.४५ वाजता ‘लक्ष्मीची पावले’ या सत्रात उद्योगपती अनिल खंवटे, भरत गीते (जर्मनी) व वैभव खांडगे (इंग्लंड) यांचे विचार ऐकण्याची संधी लाभणार आहे. सायंकाळी ४. वाजता ‘चंद्रभागेच्या तीरावर’ हा नाथ संस्थान ओसा यांचा चक्री भजन होईल. त्यानंतर ५.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन व पुरस्कार वितरणाचा मुख्य कार्यक्रम होईल.
यावेळी उद्घाटक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सामंत, महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांची उपस्थिती लाभणार आहे. डॉ. अनिल काकोडकर अध्यक्षस्थान भूषवतील. महेश मांजरेकर यांना कला जीवन सन्मान आणि अनिल खवटे यांना जागतिक मराठी भूषण सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत. उद्घाटनानंतर सायंकाळी ७.३० वाजता नितीन कोरगावकर निर्मित ‘मर्मबंधातील ठेव’ हा सावेश, साभिनय नाट्यगीत सादरीकरण कार्यक्रम होईल.
दि. १० रोजी सकाळी ९ वाजता ‘मांडवीच्या तीरावर’ हे गोव्यातील कवींचे कवीसंमेलन अध्यक्षस्थानी प्रथितयश कवी डॉ. महेश केळुस्कर असतील. ९.३० वाजता ‘माझा चित्रपट प्रवास’ मध्ये आदित्य जांभळे आपल्या कला प्रवासबद्दल बोलतील. सकाळी १० वाजता ‘समुद्रापलीकडे भाग एक’ मध्ये शैलेजा पाईक, माधव गोगावले , डॉ. अनिल देसाई, सई गणबोटे (अमेरिका), उर्मिला देवेन (जपान), राहुल उरमकर (केनिया) यांचा सहभाग असेल.
सकाळी ११.३० वाजता ‘तंत्रज्ञान दशा आणि दिशा:’ कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा या विषयावरील सत्रात डॉ. रामराव वाघ, डॉ. मनोहर चासकर व प्रसाद शिरगावकर मार्गदर्शन करतील. दुपारी २ वाजता ‘पर्यटन व सांस्कृतिक बदल’ या सत्रात दीपक नार्वेकर व डॉ. मनोज कामत विवेचन करतील. दुपारी ३ वाजता ‘माध्यमकर्मी व समाजमाध्यम’ हे सत्र होईल. संध्याकाळी ४.३० वाजता ‘मातृभाषा व जागतिकरण’ या विषयावर चंद्रकांत दळवी, दत्तात्रय वारे गुरुजी, दैनिक नवप्रभाचे संपादक परेश प्रभू विचारमंथन करतील. योगेंद्र पुराणिक (जपान) हे चित्रफिती द्वारे संवाद साधतील. सायंकाळी ६.३० वाजता ‘चित्र- शिल्प – काव्य’ या सत्रात डॉ. श्यामकांत देवरे यांची प्रमुख उपस्थिती असेल व संजय हरमलकर (चित्रकार) सचिन मदगे, (शिल्पकार), अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, विजय चोरमारे, प्रशांत मोरे,नारायण पुरी,तुकाराम धांडे,चंद्रशेखर गावस, रुजारीयो पिंटो, गुंजन पाटील आदी कवी भाग घेतील. रात्री ८.३० वाजता रुद्रेश्वर पणजी निर्मित ‘पालशेतची विहीर’ नाट्यप्रयोग होईल.
दि. ११ रोजी ९.३० वाजता ‘सुर संवाद चित्रफित’ सत्रात किरण प्रधान (ऑस्ट्रेलिया) संवाद साधतील. नेपोलियन आल्मेडा (ऑस्ट्रेलिया) हे संवादक असतील. १० वाजता ‘समुद्रातील सोने व समुद्रापलीकडे भाग २’ या सत्रात डॉ. अनिल वळसंगकर, किशोर गोरे, शशिकांत पानट (अमेरिका), अनिल नांदेडकर, डॉ. नितीन उपाध्याय (दुबई), हे सहभागी होणार आहेत. ११.३० वाजता ‘ट्रम्प ते पुनीत’ या जागतिक व्यवस्था व भारत संबंधित विषयावर गिरीश ठकार (अमेरिका), अनिल आंबेस्कर, डॉ. किरण ठाकूर, माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, वैशाली पतंगे विचार मांडतील. दुपारी २ वाजता ‘आधारवड’ मध्ये रान माणूस प्रसाद गावडे, कमलाकांत तारी व संदीप परब यांचा समावेश असेल. दुपारी ३ वाजता ‘क्रीडांगण’ सत्रात पद्मश्री उदय देशपांडे व पद्मश्री ब्रम्हानंद शंखवाळकर अनुभव कथन करतील.
सायंकाळी ४ वाजता समारोप सोहळ्याला चित्रपटील सामाजिक आशय विषयावर नागराज मंजुळे यांची मुलाखत होईल. समारोपास माझी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, केंद्रीय वीज नवीकरण मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, बाबू कवळेकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
हे संमेलन यशस्वी होण्यासाठी संमेलन कार्यवाह शिवकुमार लाड , गौरव फुटाणे, महेश म्हात्रे तसेच गोवा आयोजन समितीचे अध्यक्ष दशरथ परब, सरचिटणीस प्रा. अनिल सामंत, कार्यवाह परेश प्रभू, डॉ.गौतम देसाई व कॅप्टन सावंत हे विशेष प्रयत्नशील आहेत.

