पुणे, दि. ७ जानेवारी २०२६: भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची मल्टिस्टेज सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड टूर–२०२६’ येत्या १९ ते २३ जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार आहे. या जागतिक स्पर्धेच्या स्वागतासाठी संपूर्ण पुणे शहर सजले असून, महावितरणनेही या सौंदर्यीकरण मोहिमेत मोठे योगदान दिले आहे. स्पर्धेच्या मार्गावरील वीज यंत्रणेची स्वच्छता आणि रंगरंगोटीचे काम महावितरणने युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
ही स्पर्धा ४३७ किलोमीटर अंतराची असून, ३५ देशांतील दिग्गज खेळाडू यात सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर, सायकलिंग मार्गावरील सुमारे ५०० हून अधिक फिडर पिलर्स आणि रोहित्र स्वच्छ करण्यात येत आहेत. जुन्या, गंजलेल्या आणि अनधिकृत पोस्टर्समुळे विद्रुप झालेल्या या यंत्रणेची रंगरंगोटी केली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याचे रूप ‘स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध शहर’ म्हणून दिसावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
केवळ सौंदर्यीकरणच नव्हे, तर महावितरणकडून या यंत्रणेची अंतर्गत देखभाल आणि दुरुस्तीही केली जात आहे. यामुळे स्पर्धेदरम्यान अखंडित वीजपुरवठा राहील आणि तांत्रिक बिघाडामुळे होणारे संभाव्य अपघात टाळता येतील.
विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा
“वीज यंत्रणा ही सार्वजनिक मालमत्ता असून तिचे विद्रुपीकरण करणे हा गुन्हा आहे. काही संस्था किंवा व्यक्ती जाहिराती चिटकावून ही यंत्रणा खराब करतात. यापुढे अशा विद्रुपीकरण करणाऱ्यांवर महावितरणकडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा महावितरण पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी दिला आहे.

