पुणे, दि. ६ जानेवारी २०२६ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहांना विविध बँकांमार्फत बँक पतपुरवठा सुलभ व्हावा, यासाठी जिल्हास्तरावर प्रत्येक बँक शाखेला उद्दिष्ट देण्यात येते. ही उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य व्हावीत तसेच बँक व्यवस्थापकांचे सहकार्य अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने जिल्हा परिषद, पुणे येथे आज जिल्हास्तरीय अनिवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षणात विविध बँकांच्या शाखांतील १९३ बँक व्यवस्थापकांनी सहभाग घेतला. उमेद अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समूहातील महिलांची यशोगाथा, लखपती दिदींचे मनोगत, बीसी सखीचे अनुभव तसेच माहितीपर चित्रफिती सादर करण्यात आल्या.
जिल्ह्यातील लखपती दिदी, लघु व्यावसायिक महिला, शेती व बिगर शेतीतील विविध उपक्रम, तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची सांगड घालून महिलांना कर्जपुरवठा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही, अनुत्पादक मत्ता (एनपीए) विषयक बाबींवर सखोल चर्चा झाली. यासोबतच बँकर्सकडील ऑनलाईन रिपोर्टिंगसंदर्भातील शंका-समाधानावरही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था (एनआयआरडी), हैदराबाद येथील श्रीनिवास राव व श्रीमती शेफाली सिंह यांनी स्वयंसहाय्यता समूह बँक कर्ज, वैयक्तिक बँक कर्ज, डिजिटल फायनान्स, सामाजिक सुरक्षा व आर्थिक साक्षरता या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू, जिल्हा अग्रणी बँकेचे एलडीएम योगेश पाटील, पुणे जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देसाई यांनी उपस्थित बँकर्सना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद पुणे येथील अधिकारी-कर्मचारी, सर्व जिल्हा व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक व बँक व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

