पुणे- आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वत्र प्रचार सुरू झाले आहेत. तसेच पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी ही स्वबळावर लढत असून अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गलथान कारभारावर टीका करत अप्रत्यक्ष भाजपवर निशाणा साधला होता. त्यावर भाजपच्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तर दिले. या सगळ्यावर पुन्हा एकदा अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, या महानगरपालिकेत मी गेली 25 वर्षे काम केले आहे. माझ्या नेतृत्वात या महापालिकेचा कसा कायापालट झाला हे तमाम पिंपरी चिंचवडकरांनी पाहिले आहे. परंतु, गेल्या 9 वर्षात इथे काय अवस्था झाली हे आपण सर्वांनी बघितले आहे. त्यामुळे निवडणुकीत महानगरपालिकेशी संबंधित प्रश्नांचा ऊहापोह झाला पाहिजे, असे म्हणत पवारांनी भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेला एक प्रकारे प्रत्युत्तरच दिले आहे. ते पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, इथे गेल्या 9 वर्षात जो काही नियोजनशून्य कारभार झाला किंवा कर्जबाजारी आपल्या महापालिकेला केले किंवा मोठ्या प्रमाणावर कामांची बिले देणे बाकी आहे, या सगळ्या ज्या काही गोष्टी केल्या आहेत. आणि आम्ही 25 वर्षात नेहमी नवीन नवीन काही गोष्टी उभ्या करून दाखवल्या, तसे या 9 वर्षात घडले नाही, असेही पवार म्हणाले.
चंद्रकांत पाटलांनी मेट्रोच्या कामाचे श्रेय घेत अजित पवारांवर टीका केली होती. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आपल्याला माहित आहे की मेट्रोला मंजूरी त्या काळात कोणी दिली होती. मेट्रोचे भूमिपूजन करताना पिंपरीमध्ये आणि पुण्यात दोन्हीकडे राष्ट्रवादीचा महापौर होता. त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केले आणि बाकीच्या बाबतीत केंद्र आणि राज्य सरकारकडून आम्ही निधी आणण्याचे काम करूच. पण इथे जे यक्ष प्रश्न निर्माण झाले आहेत आणि आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही जे उमेदवार दिले आहेत, त्या सगळ्यांनी एकोपयाने काम करण्याचा सल्ला मी दिला आहे.
काही उमेदवारांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, कोणालाही निवडणुकीला उभे राहिल्यानंतर जीवाला जर भीती असेल तर त्याला सुरक्षितता देणे हे पोलिसांचे काम आहे. मागणी कुठल्या उमेदवाराने केली, कुठल्या प्रभागातल्या उमेदवाराने केली, त्यानुसार सुरक्षा दिली पाहिजे.
अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील असे आशिष शेलार म्हणाले होते, यावर प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, मी आपल्याला सांगू का, तुम्हाला (पत्रकारांना उद्देशून) विकासाचे काही पडलेले नाही. तुम्हाला कुठून तरी काही तरी आमच्यात अंतर कसे वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारात आहात. मी आत्ता महानगरपालिकेच्या संदर्भातच उत्तर देईल आणि निवडणुका संपल्यावर मी सगळ्या प्रश्नांचे उत्तर देईल. तसेच माझे वक्तव्य फुगवून सांगण्यात आले, मी फक्त महापालिकेच्या संदर्भात बोललो होतो आणि मी गलथान कारभारावर बोलणार, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

