पुणे – जलसिंचन, मुंढवा जमीन घोटाळा तसेच इतर प्रकरणांबाबत चौकशी सुरू असून सत्य समोर येईल असे सांगत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या विकासावर केलेल्या विधानांवर महसूलमंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पुणे शहराचा गेल्या काही वर्षांत मोठा बदल झाला असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अभूतपूर्व विकास झाला आहे, हे अजित पवार खासगीतही मान्य करतील, असा दावा बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केला. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या काळात झालेल्या विकास योजनांची सविस्तर यादी आपण अजित पवार यांना पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपाचे नाव घेऊन टीका करण्याचे कर्तृत्व अजित पवार यांनी दाखवू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजपचे माजी गटनेते गणेश बीडकर उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्र मंत्रिमंडळासमोर २०४७ पर्यंतचा ‘विकसित महाराष्ट्र’ आराखडा मंजुरीसाठी असून त्याअंतर्गत विकसित पुण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्यात आले आहे. पुणे शहराला केंद्रस्थानी ठेवून मेट्रो जाळ्याचे विस्तारीकरण, पर्यावरणपूरक व्यवस्था, सक्षम सार्वजनिक वाहतूक, समान पाणीपुरवठा, रस्ते विकास, नदी सुधार प्रकल्प, पुरंदर विमानतळ विकास, भूमिगत सांडपाणी व्यवस्था, झोपडपट्टी पुनर्वसन, स्मार्ट शाळा, समाविष्ट गावांचा विकास, गुंठेवारी नियम सुलभ करणे, अनधिकृत बांधकामे अधिकृत करणे आणि प्रत्येक घराचे मॅपिंग अशा विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा व नगरपरिषद निवडणुकांत जनतेने भाजपला भरभरून मतदान केले असून आगामी महापालिका निवडणुकीतही भाजपला ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. “विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास” हे समीकरण जनतेच्या मनात निर्माण झाले आहे, असेही ते म्हणाले.
सन २०१७ पूर्वीचा पुणे आणि आजचा पुणे यातील बदल गुगलवरही दिसून येईल, असा टोला लगावत महायुतीतील सात सदस्यांची समन्वय समिती असून मित्रपक्षांमध्ये वाद निर्माण होतील अशी विधाने कोणीही करणार नाही, असे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. जलसिंचन, मुंढवा जमीन घोटाळा तसेच इतर प्रकरणांबाबत चौकशी सुरू असून सत्य समोर येईल, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, वॉर्ड क्रमांक २४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सरचिटणीस अमर कोरे, उपाध्यक्ष वनिता जगताप व आयेशा अमर कोरे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला.
जलसिंचन, मुंढवा जमीन घोटाळा तसेच इतर प्रकरणांबाबत चौकशी सुरू असून सत्य समोर येईल-
Date:

