जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पर्धेअंतर्गत येणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या मार्गाची पाहणी
पुणे, दि. ६: ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मार्ग तसेच गावाचेही दूर चित्रवाहिनीद्वारे जागतिक पातळीवर थेट प्रक्षेपण होणार असून आपल्या गावाची दृश्य देश विदेशात पोहचणार आहे, याद्वारे पर्यटनाला चालना तसेच स्थानिकांना रोजगार आणि पर्यायाने गावाचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे, त्यामुळे प्रशासनाने मार्गावर संपूर्ण स्वच्छता राहील, यादृष्टीने स्थानिकांना विश्वासात घेवून सुक्ष्म नियोजन करावे, प्रशासनासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, गृहनिर्माण सोसायटी व गणेश मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आदी घटकांनी मिळून मोहिमस्तरावर स्वच्छता मोहिम राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आज ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ च्या टप्पा-२ च्या अनुषंगाने संपूर्ण स्पर्धा मार्गावरील असलेल्या गावनिहाय पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार शंकर मांडेकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने, पुरंदरच्या वर्षा लांडगे, भोर वेल्हाचे विकास खरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, पुणे शहरचे तहसीलदार अर्चना निकम, पुरंदरचे विक्रम राजपुत, वेल्हा श्रीनिवास ढाणे, ‘बजाज पुणे ग्रँड टूर’चे तांत्रिक सल्लागार पिनाकी बायसक आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी आज पुरंदर तालुक्यातील श्री दत्तमंदीर सभागृह नारायणपूर, भोर तालुक्यातील अविनाश मल्टिपर्पज हॉल, कापूरव्होळ, भोर तालुक्यातील शिवालय गार्डन मंगल कार्यालय, खेडशिवापूर, श्री दत्तमंदीर करंजावणे, हवेली तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय, डोणजे येथे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, मुख्याध्यापक आदींची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी श्री. डूडी यावेळी म्हणाले, आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धेचे महत्व लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार रस्ते तयार करण्यात आले आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या गाव व परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, पर्यटनस्थळे, शिवकालीन इतिहास जगभर पोहोचविण्याची संधी आहे. या टप्पाअंतर्गंत येणाऱ्या गावात खेळाडू आल्यास स्वयंशिस्त पाळत महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, संगीत, वेशभुषा, नाटक, पथनाट्य, लोकनाट्य आदी माध्यमाद्वारे स्वागत करावे, स्पर्धेवेळी येथील ग्रामस्थानी, नागरिकांनी स्पर्धेच्या मार्गावर बाजूला उभे राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा. असे करतांना स्पर्धेला अडथळा निर्माण होणार नाही, मार्गावर पाळीव प्राणी येऊ देऊ नयेत, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.
ही स्पर्धा फक्त महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचा इतिहास पुढे येणार आहे असून एक नवीन इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सर्वांनी एकत्रित होऊन मोठे काम होऊ शकते हे दाखवून देऊ, असा विश्वास व्यक्त करत प्रशासनासोबत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. डुडी यांनी केले.
आमदार श्री. मांडेकर म्हणाले, ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ही आंतराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा जिल्ह्यात होत असून याद्वारे पर्यटनास चालना मिळणार आहे, त्यादृष्टीने प्रशासन अहारोत्र काम करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारंभी लेडीज कल्ब येथून पाहणी दौऱ्यास सुरुवात करत नांदेड सिटी येथे समारोप केला. यावेळी गावनिहाय जिल्हाधिकारी, आमदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने काढलेल्या चित्रांनी स्वागत केले, यामाध्यमातून स्पर्धेबाबत त्याच्या मनात कमालीची उत्सकूता दिसून येत होती.
असा असेल स्पर्धेचा टप्पा-२
लेडीज कल्ब, कॅम्प येथून प्रारंभ होऊन गोळीबार चौक, कोंढवा, येवलेवाडी, भिवरी, चांबळी, कोडीत, नारायणपूर, चिव्हेवाडी, केतकावळे, कापूरव्होळ, कासुर्डी, मोहरी, जांबळी, आंबवणे, करंजावणे, वांगणी, निघडे, कुसगाव, खेड शिवापूर, कोंढणपूर, सिंहगड घाट रोड, डोणजे, किरकिटवाडी, खडकवासला आणि नांदेड सिटी सिंहगड रोड येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे.

