पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा गड असलेला कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल हा प्रभाग क्रमांक 24 येथे भाजपला मिळणारा पाठिंबा वाढता आहे. आज प्रभाग क्रमांक 24 मधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला प्रभागात मोठा धक्का बसला असून, भाजपसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून प्रभागातील राजकीय चित्र बदलले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेत्यांच्या या प्रवेशाने ते चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या उपाध्यक्ष वनिता विश्वास जगताप, सरचिटणीस अमर सुभाष कोरे आणि सदस्य आयेशा अमर कोरे यांचा समावेश आहे. या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
वनिता विश्वास जगताप या प्रभागात सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय आहेत, तर अमर सुभाष कोरे आणि आयेशा अमर कोरे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या प्रभागातील पायाभूत संरचनेला खिंडार पडले असून, गणेश बिडकर यांच्या विजयला अधिक बळ मिळाले आहे.
गणेश बिडकर यांनी प्रभागात केलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढला आहे. कमला नेहरू आणि केईएम हॉस्पिटलसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये सुविधा वाढवणे, ‘लाईट हाऊस’ उपक्रमातून महिलांना रोजगाराच्या संधी देणे यासारख्या कामांमुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास झाला आहे. आम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये येण्याचे कारण म्हणजे हेच विकासाभिमुख नेतृत्व आहे,” अशी भावना प्रवेशावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

