ही अभद्र युती आणि शिवसेनेचा घात; शिंदे गट आक्रमक
भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 अशा एकूण 32 नगरसेवकांची मोट
मुंबई-अंबरनाथ नगरपरिषदेच्या सत्तेच्या समीकरणात मोठी उलथापालथ झाली असून सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाने शिंदेसेनेला बाजूला ठेवून चक्क काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याशी हातमिळवणी केली आहे. या नव्या युतीमुळे शिवसेना शिंदे गट 23 जागांवर विजय मिळवून देखील सत्तेपासून दूर फेकली गेली आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या एकूण ५९ जागांपैकी बहुमतासाठी ३० जागांची आवश्यकता होती. निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले नगराध्यक्षपदी निवडून आल्या असल्या, तरी भाजपला बहुमत मिळाले नव्हते. सत्तेचा आकडा गाठण्यासाठी भाजपने स्वत:चे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 अशा एकूण 32 नगरसेवकांची मोट बांधत अंबरनाथ नगर परिषदेत सत्ता स्थापन केली आहे. या अजब समीकरणामुळे ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपने अंबरनाथमध्ये मात्र सत्तेसाठी काँग्रेसची साथ घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याने शिवसेना शिंदे गट कमालीचा संतप्त झाला आहे. अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी या युतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “एकीकडे काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे सत्तेसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी करायची, ही शुद्ध फसवणूक आहे. भाजपने शिवसेनेचा घात केला असून ही युती अत्यंत अभद्र आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
शिवसेनेच्या टीकेला भाजपचे उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी तितक्याच धारदार शब्दांत उत्तर दिले आहे. “गेल्या २५ वर्षांपासून अंबरनाथमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या शिंदे गटासोबत सत्तेत बसलो असतो, तर ती खऱ्या अर्थाने अभद्र युती ठरली असती. आम्ही महायुतीसंदर्भात अनेकदा बोलणी करण्याचा प्रयत्न केला, पण शिंदे गटाच्या नेत्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही,” असा पलटवार करंजुले पाटील यांनी केला.
अंबरनाथची ही निवडणूक भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. भाजपच्या तेजश्री करंजुले यांनी शिंदे गटाच्या मनिषा वाळेकर यांचा पराभव करत नगराध्यक्षपद पटकावले. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष भाजपाचा झाला असला तरी देखील याठिकाणी सर्वाधिक नगरसेवकपदाचे उमेदवार शिवसेनेचे विजयी झाले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपद असूनही भाजपकडे बहुमत नव्हते. आता भाजप आणि काँग्रेसच्या युतीमुळे शिवसेना शिंदे गटाला सर्वाधिक २३ जागा जिंकूनही विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.
राज्यातील महायुतीमध्ये ‘ऑल इज वेल’ असल्याचा दावा नेत्यांकडून केला जात असला तरी, अंबरनाथच्या या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील दरी प्रचंड वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

