एमआयटी एडीटी’ विद्यापीठात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा
पुणे: स्वयंशिस्तीमुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत नसून, प्रत्यक्षात आपले रक्षण होत असते. वाहतूक सुरक्षा ही एक सामूहिक जबाबदारी असून, खरे सामर्थ्य वेगात नसून नियंत्रणात असते. हे तरुणांनी समजून घेतले पाहिजे आणि सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन पुणे परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी केले.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठात पोलीस वर्धापन दिन आणि रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित व्यसनमुक्ती व वाहतूक जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन एमआयटी एडीटी विद्यापीठ, हडपसर वाहतूक विभाग आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
याप्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनिता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., हडपसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण सहाय्यक संचालक डॉ. प्रतिभा जगताप, अधिष्ठाता डॉ. गणेश पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांनी विद्यार्थ्यांना जीवनात ‘३६०-डिग्री’ दृष्टिकोनाचा अवलंब करण्याची गरज प्रतिपादित केली. सर्वसमावेशक दृष्टिकोन अंगीकारण्यासाठी स्वयंशिस्त ही पहिली गरज असून, स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करण्याचे आणि व्यसनमुक्तीसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ‘विश्वशांती प्रार्थने’ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी आपल्या प्रास्ताविकात स्वयंशिस्तीचे महत्त्व विशद केले.
पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी वाहतूक नियमांच्या पालनावर भर दिला आणि विद्यापीठाच्या शिस्तीचे कौतुक करताना ही शिस्त आध्यात्मिक पायावर निर्माण झाल्याचे नमूद केले. वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी वाहतूक सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. प्रतिभा जगताप यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
‘कम्युनिटी पोलिसिंग’मध्ये युवकांचा सहभाग आवश्यक!
अंतर्गत सुरक्षेसाठी ‘कम्युनिटी पोलिसिंग’ आवश्यक असून, पोलीस वर्धापन दिन सप्ताहादरम्यान तरुणांनी पोलिसांशी संवाद साधावा. पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील कार्यपद्धती समजून घ्यावी, तसेच वाहतूक व्यवस्थापनात स्वयंसेवक म्हणून काम करून पोलीस दलाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.

