पुणे-पुण्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन कन्या, जावई आणि नातवंडं असा परिवार आहे.गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. पुण्याचा ‘सबसे बडा खिलाडी.. सुरेश कलमाडी’ अशी टॅगलाईन त्यांनी आयुष्यभर मिरवली.सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत1 मे 1944 रोजी जन्मलेल्या सुरेश कलमाडी यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सहा वर्षांहून अधिक काळ सेवा दिली. हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
त्यांनी पुण्याचे खासदार म्हणून दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. रेल्वे राज्यमंत्री असताना रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे ते एकमेव राज्यमंत्री होते, ही एक विशेष बाब आहे.कलमाडी यांचे नाव पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक उपक्रमांशी जोडले जाते. त्यांनी ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ यांसारख्या स्पर्धा सुरू करून शहराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून दिली.1996 ते 2011 या काळात त्यांनी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात भारतात अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. 2010 मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजक समितीचे ते अध्यक्ष होते. या स्पर्धांदरम्यान त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि 2011 मध्ये त्यांना अटकही झाली होती. मात्र, तपासाअंती पुरावे अपुरे ठरल्याने 2025 मध्ये ईडीने क्लोजर रिपोर्ट सादर केला, जो न्यायालयाने स्वीकारला.पण तोपर्यंत ,आरोग्य आणि राजकारण अशा पातळीवर कलमाडी यांच्या तळपत्या सूर्याचा अस्त झाला होता.
१९७८ मध्ये सुरेश कलमाडी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९८२ मध्ये वयाच्या ३८ व्या वर्षी सुरेश कलमाडी यांनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. त्यानंतर सलग ३० वर्षे सुरेश कलमाडी खासदार होते. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात सुरेश कलमाडी रेल्वेमंत्री म्हणून कार्यरत होते. २०१० पासून सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा सुरू झाली. २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणात सुरेश कलमाडी यांच्यावर आरोप करण्यात आले होते. यावेळी विरोधकांनी सुरेश कलमाडी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणात सुरेश कलमाडी यांना ९ महिने तुरुंगवास देखील भोगावा लागला होता.एक काळ होता जेव्हा कलमाडी म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे कलमाडी हे समीकरण होते. पुणे महापालिका कलमाडी गटाच्या ताब्यात होती. एवढंच काय तेव्हा पुण्यात निर्णय देखील कलमाडी हाऊसमधूनच व्हायचा. कर्वेरोडला लागून असलेलं दोन मजली कलमाडी हाऊस म्हणजे सत्तेचं केंद्रच होतं. कार्यकर्ते तिथं जमायचे. कलमाडी विमानतळावर यायचे तेव्हा त्यांच्या स्वागताला जणू जत्रा भरायची.

