पुणे:बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेजसमोरील (Pune News) विवा हॉलमार्क सोसायटीमध्ये असलेल्या ग्राऊंड प्लस ११ मजली इमारतीच्या फ्लॅट क्रमांक ८०२ मध्ये सोमवारी दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच NDA अग्निशमन केंद्र, चांदणी चौक येथील पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
दुपारी १.४० वाजता अग्निशमन वाहन रवाना होऊन २.५६ वाजता घटनास्थळी पोहोचले. प्रभारी अधिकारी सुनील नामे यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. जवानांनी रस्सीच्या सहाय्याने होजरील होज आठव्या मजल्यावर नेऊन खिडकी व मुख्य दरवाजातून आगीवर पाण्याचा मारा करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
या आगीत फ्लॅटमधील हॉलचे इंटिरिअर, इलेक्ट्रिक वायरिंग, टीव्ही, सोफा, स्टडी रूममधील कपाट, पुस्तके, बेड तसेच खिडक्यांच्या काचा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इतर दोन खोल्या व स्वयंपाकघरात धुरामुळे रंग खराब झाला. तसेच वरच्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ९०२ मध्ये खिडक्यांच्या काचा फुटून स्टडी रूममध्ये किरकोळ स्वरूपाची झळ बसली.
सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सोसायटीची फायर फायटिंग सिस्टीम बंद असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांना ती तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मदतीसाठी बानेर येथील फायरगाडीही घटनास्थळी दाखल झाली होती, मात्र आग नियंत्रणात आल्याने तिला परत पाठवण्यात आले

