महाराणी ताराराणी यांचे पराक्रम आणि शौर्य पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी.
ज्येष्ठ इतिहासकार डॉ, जयसिंगराव पवार यांचे प्रतिपादन.
पुणे दि. 5 जानेवारी 2026 :
सरहद संस्थेच्या वतीने (गुजर निंबाळकरवाडी, कात्रज) सरहद ग्लोबल स्कूल कडे जाणाऱ्या रस्त्याचे ‘स्वराज्य सौदामिनी मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराराणी पथ ’ नामकरण जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. सुरेश भाऊ कदम (माजी नगरसेवक) यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. जयसिंगराव पवार (ज्येष्ठ इतिहास संशोधक) यांनी भूषविले.
या ऐतिहासिक व गौरवशाली प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून देण्यात आलेले हे नाव प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. मा. सुरेश भाऊ कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ सरहद संस्थेमुळेच हे नामकरण शक्य झाले,” स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या महाराणी ताराराणी यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठीच्या प्रत्येक उपक्रमाला स्थानिक जनतेचा पाठिंबा राहील. माझ्या हस्ते हे नामकरण होणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या पराक्रमाचा गौरव करताना सांगितले की ताराराणी यांच्या ३५० व्या. जयंतीनिमित्त देशभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांचे नेतृत्व मयूर मसुरकर करणार आहेत.
यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराराणी हे एक इतिहासातील दुर्लक्षित पान असुन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्यानंतर स्वराज्य टिकविण्याची दैदिप्यमान कामगिरी केली. स्वराज्य बुडवायला आलेल्या औरंगजेबाला या मातीतच शेवटचा श्वास घ्यावा लागला तो ताराराणी यांच्यामुळेच. दुर्दैवाने आज जगातील या महान योद्धा राणीचे नाव विस्मृतीत जात आहे. अशा काळात पुण्यात त्यांचे नाव रस्त्याला देणे आणि ताराराणी यांच्या नावाने मुलींची सैनिकी शाळा काढणे ही भविष्यात देशभरातील मुलींना प्रेरणा देणारी गोष्ट आहे. त्यांचा संघर्ष सत्तेसाठी नव्हता तर हिंदवी स्वराज्यासाठी होता. सरहद संस्थेने घेतलेला या पुढाकाराने माझा ऊर अभिमानाने भरुन आला आहे. शासनानेही अनेकदा घोषणा केल्या मात्र कृती होत नाही. पन्हाळा गडावर माझ्या हयातीत छत्रपती ताराराणींचा पुतळा उभा करणे हे माझे स्वप्न आहे. या कार्यक्रमास लेखिका सौ. वसुधा जयसिंगराव पवार, डॉ.मंजुश्री पवार, सामाजिक कार्यकर्ते महेश कदम, शाळा विभाग प्रमुख मनीषा वाडेकर, लेशपाल जवळगे, मुख्याध्यापिका निर्मला नलावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकला रांजणे यांनी केले, तर मयूर मसुरकर यांच्या आभार प्रदर्शनाने या ऐतिहासिक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

