पुणे :भाजपने मनपात अकार्यक्षम कारभार केला असून, याविरोधात काँग्रेसने वेळोवेळी आवाज उठवला आहे. भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष यांची निवडणुकीत केवळ ‘नुरा कुस्ती’ सुरू आहे. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी येथे केला. पुणे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात भाजपच्या बिनविरोध निवडप्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसकडे १६५ जागांवर सक्षम उमेदवार असतानाही, भाजपने आर्थिक मार्गाने लोकशाहीला घातक ठरणारी बिनविरोध निवडप्रक्रिया सुरू केल्याचे जोशी म्हणाले.बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक लोकमतावर निवडून आलेले नाहीत, असे जोशींनी नमूद केले. भाजपने ज्या पद्धतीने आर्थिक मार्गाने दबाव निर्माण करून अर्ज माघारी घेण्यास लावले, ती प्रक्रिया लोकशाहीसाठी अयोग्य आणि घातक आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारासोबतच पक्षाच्या प्रमुखाची सही एबी फॉर्मवर असावी, अशी मागणी काँग्रेस करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांची आघाडी झाली आहे. या आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत मोहन जोशी बोलत होते. यावेळी अजित दरेकर, प्राची दुधाने आणि युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे उपस्थित होते. काँग्रेस सुमारे १०० जागा लढवत असून, महादेव जानकर यांच्या रासपा आणि आम आदमी पक्षाला काही जागा देण्यात आल्या आहेत. शिवसेना ६५ जागांवर निवडणूक लढवत आहे.
जोशी यांनी माहिती दिली की, पुणे मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे एकूण ४०० उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी १६५ जागांवर पक्षाकडे सक्षम उमेदवार उपलब्ध होते. समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन मतविभाजन टाळण्याचा काँग्रेसचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुती म्हणून निवडणुकीस सामोरे जाण्याचे सांगतात, परंतु सत्तेतील इतर दोन पक्ष (शिंदे गट आणि अजित पवार गट) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांच्यासोबत नाहीत, याकडे जोशींनी लक्ष वेधले. पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड मनपातील भाजपच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली असूनही ते राज्यात सत्तेत सहभागी आहेत, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपचा खरा विरोधक काँग्रेस पक्षच असून, काँग्रेस सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे, असे जोशी म्हणाले.
काँग्रेस पक्षाकडून मनपा निवडणूक प्रचार मोहीम सुरू करण्यात आली आहे. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांचा एकत्रित प्रचार होणार असून, दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचारात सहभागी होणार आहेत. आघाडीचा जाहीरनामा ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध केला जाईल, अशी माहितीही मोहन जोशी यांनी दिली.

