पुणे, दि.५: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना ‘सीडीएस’ या परीक्षेच्या तयारीकरिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे १९ जानेवारी ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सीडीएस’ अभ्यासक्रम क्रमांक ६६ चे आयोजन करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेण्याकरिता जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे १८ जानेवारी रोजीपर्यंत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मुलाखतीस येतांना सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सीडीएस-६६ या अभ्यासक्रमाकरिता असलेले प्रवेशपत्र किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेल्या प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची मुदित प्रत तीन प्रतीत भरुन सोबत घेऊन यावी. अभ्यासक्रम कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे.
या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याकरिता पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता इच्छुक उमेदवारांनी धारण केलेली असावी. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या उमेदवार परीक्षेकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या training.pctcnashik@gmail.com ईमेल व ०२५३-२४५१०३२ दुरध्वनी क्रमांक किंवा ९१५६०७३३०६ व्हॉटसअप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

