पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर प्रभारी अध्यक्षपदी श्रीकांत विश्वनाथ पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, विशाल विलासराव तांबे यांची पुणे शहर निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.
या नियुक्त्या माजी महापौर प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर झाल्या आहेत. मनपा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी होणार असल्याने जगताप यांनी पदाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
विशाल तांबे हे पक्षाचे ज्येष्ठ आणि अनुभवी माजी नगरसेवक आहेत. त्यांनी यंदा निवडणूक न लढवता पक्ष संघटनेत काम करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे त्यांची शहर निवडणूक समन्वयकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात आघाडी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुण्यात एकूण ४३ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, तर अजित पवार गटाने १३८ उमेदवार उभे केले आहेत. आघाडीमुळे अनेक मतदारसंघांत एका पक्षाचे तीन उमेदवार असतील, तिथे चौथ्या उमेदवाराने त्या पक्षाचे चिन्ह घ्यायचे असे धोरण ठरले आहे.
यामुळे काही प्रभागांमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. उदाहरणार्थ, प्रभाग क्रमांक ४ मध्ये सर्व उमेदवार ‘तुतारी’ चिन्हाचे आहेत, तर काही प्रभागांमध्ये दोन ‘तुतारी’ आणि दोन ‘घड्याळ’ चिन्हाचे उमेदवार आहेत.
प्रभाग क्रमांक १६, हडपसरगाव, सातववाडी येथे मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त आघाडीचे ‘घड्याळ’ चिन्हावरील अधिकृत उमेदवार म्हणून वैशाली बनकर, कमलेश कापरे, वर्षा पवार आणि योगेश ससाणे यांना उभे करण्यात आले आहे. शरदचंद्र पवार यांच्या पक्षानेही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भाग्यश्री विक्रम जाधव आणि अविनाश काळे यांना आधी उमेदवारी दिली होती. परंतु दोन्ही पक्षांची संयुक्त आघाडी असल्याने त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. त्यांनी अर्ज माघारी न घेतल्याने त्यांच्यावर पक्षशिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली आहे

