मुंबई- आपल्या आक्रमक शैलीने राजकारण गाजवणारे भाजप खासदार नारायण राणे यांनी आता राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. “आता घरी बसायचं ठरवलंय, दोन्ही मुलांना सांगेन नांदा सौख्यभरे,” अशा शब्दांत त्यांनी आपली राजकीय निवृत्ती जवळ आल्याचे स्पष्ट केले. सिंधुदुर्गातील सभेत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना इथून पुढे निलेश आणि नितेश राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
सिंधुदुर्गात नारायण राणेंचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी आपल्या भाषणात बोलताना त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेत. नारायण राणे म्हणाले, वय वाढत चालल्याने आता शरीर थकत चालले असून विश्रांतीची गरज आहे. दोन्ही मुले आता राजकारणात पूर्णपणे सेट झाली आहेत, त्यामुळे आता कुणीतरी फॅमिली बिझनेसकडे लक्ष देणे गरजेचे आहे. राजकारणात कट कारस्थान केले जातेय, म्हणून ठरवले, आता घरी बसायचे. दोन्ही मुले राजकारणात चांगले काम करत आहेत. चांगल्याला जोपासा, आणि सेवा करून घ्या, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
आपल्या साध्या राहणीमानाचा उल्लेख करताना राणे म्हणाले, “मी आजही रस्त्यावर उतरून भाजी घेतो. अनेकांना हातात अंगठ्या आणि काळ्या काचेच्या गाड्या घेऊन फिरण्याची सवय असते, पण माझ्या गाडीला कधीच काळ्या काचा नसतात. माणुसकी हाच माझा खरा धर्म आहे”. आपल्या राजकीय प्रवासात अनेकदा अडचणी आणल्या गेल्या, पण तरीही आपण डगमगलो नाही, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राणे यांनी स्पष्ट शब्दांत बजावले की, “पक्ष सांभाळा, स्वार्थ नको. पैशासाठी राजकारण करू नका, कारण असले पैसे कधीच पचत नाहीत.” माझ्यानंतर निलेश आणि नितेश हेच विकासात्मक राजकारण पुढे नेतील, त्यांनी हाक दिली तर त्यांना साथ द्या, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
राजकारणात जून महिना प्रत्येक निवडणुकीत दिसतो. कुणावर विश्वास ठेवावा असे लोक दिसत नाहीत. मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो, मात्र आजही लोक नाव काढतात. लोकसभा जिंकलो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या प्रेमापोटी भारावून गेलो. द्वेषाच्या राजकारणाला थारा देऊ नका, माझ्या रस्त्यात आला तर मी थारा देणार नाही. पक्ष सांभाळा, स्वार्थ नको. या जिल्ह्यात माझ्या अगोदर आणि माझ्या नंतर एखाद्या नेत्याने माझ्यासारखे काम केलेले दाखवा असेही नारायण राणे म्हणाले.

