शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा पूर्व पुणे भागात प्रचाराचा जोरदार शुभारंभ
पुणे दि.४: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने पूर्व पुण्यातील प्रभागांमध्ये प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. प्रभाग क्रमांक ३ (विमाननगर-लोहगाव) मधील उमेदवार सौ. गायत्री हर्षवर्धन पवार (क पॅनेल) आणि श्री. हेमंत सिताराम बत्ते (ड पॅनेल) यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या माजी नगरसेविका मंदाकिनीताई खुळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासकामांचा धडाका सुरू असल्याचे सांगितले. वडगावशेरीसह इतर भागातील पाणी प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. शिंदे साहेबांबरोबर चर्चा करून भामा-असखेड किंवा इतर स्रोतांमधून या परिसराला पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचा प्रश्न मार्गी लावू. तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेत ‘अंधाराचा उजेड’ करण्यासाठी हेमंत बत्ते यांच्यासह शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केले.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ६ (येरवडा-गांधीनगर) मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किशोर चंद्रकांत वाघमारे, कोमल अभिजित वाघचौरे, स्नेहल सुनील जाधव आणि आनंद रामनिवास गोयल यांच्या प्रचारासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीपूर्वी काळभैरवनाथ मंदिराच्या समोर यश प्रसाद वाघचौरे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला.

