पुणे –
तळजाई टेकडी येथील सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम तसेच वाळवेकर लॉन येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. या संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल आणि पॅनलच्या तीनही उमेदवारांनी तळजाई टेकडीवर सकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला आणि विकासासाठी “शिवसेनेचे धोरण कणखर” यावर चर्चा केली.नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस या शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार केला.

यावेळी ज्येष्ठ नागरिकांशी झालेल्या संवादात आबा बागुल यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ समाजासाठी, कुटुंबासाठी आणि शहराच्या जडणघडणीसाठी वाहिलेल्या ज्येष्ठांचा सन्मान राखणे आणि त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे ही आपली जबाबदारी असल्याचे आवर्जून नमूद केले.
या संवादादरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य सुविधा, नियमित वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, विरंगुळ्यासाठी मोकळ्या जागा, सुरक्षित चालण्याचे मार्ग, स्वच्छतागृहे, सार्वजनिक बस थांबे, तसेच प्रशासनाशी संबंधित कामांमध्ये येणाऱ्या अडचणी याबाबत आपली मते मांडली. अनेक ज्येष्ठांनी एकटेपणा, मानसिक तणाव आणि संवादाच्या अभावाकडेही लक्ष वेधले.
यावर आबा बागुल म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाचा अनुभवसंपन्न आधारस्तंभ आहेत. त्यांच्या समस्या केवळ ऐकून घेऊन चालणार नाहीत, तर त्या तातडीने सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र हेल्पडेस्क, नियमित आरोग्य शिबिरे, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र तसेच आवश्यक त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात सुलभता आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्राधान्याने राबवण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. समाजाचा विकास हा सर्व घटकांना सोबत घेऊनच होतो. ज्येष्ठ नागरिक सुखी, सुरक्षित आणि सन्मानाने जगतील, यासाठी मी कटिबद्ध आहे, असे आबा बागुल यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळाल्याने अनेकांनी आबा बागुल यांचे आभार मानले.

