पुणे.दि.४: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील तीन प्रभागांमध्ये प्रचाराला धडाक्यात सुरुवात झाली. प्रभाग क्रमांक १० (बावधन-भुसारी कॉलनी) येथे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन, प्रभाग क्रमांक ७ (गोखलेनगर-वाकडेवाडी) मध्ये भव्य रॅली आणि प्रभाग क्रमांक ९ (सुस-बाणेर-पाषाण) येथे मंदिर दर्शनाने आणि भव्य रॅलीने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवार धनवटे मंगल निलेश, सोनटक्के मंगल दादाराव आणि उभे रमेश निवृत्ती यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी कार्यक्षम नगरसेवकांची आवश्यकता असल्याचे सांगितले. “धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांना बहुमताने निवडून द्या,” असे आवाहन त्यांनी केले.
प्रभाग क्रमांक ७ मध्ये उमेदवार जाधव धनंजय नंदू, तुरेकर संजय हनुमंत आणि लांडगे सोनाली संतोष यांच्या प्रचारासाठी गोऱ्हे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते.
प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवार मयूर तुळशीराम भांडे यांच्या प्रचाराची सुरुवात म्हाळुंगे गावातील भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन नारळ फोडून करण्यात आली. यावेळी युवसेना प्रदेश सचिव किरण साळी, माजी सरपंच नामदेवराव गोलांडे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब भांडे, पोलीस पाटील शांताराम पाडळे, सोपानराव पाडळे, अनिकेत बनसोडे, सौरभ राजगुरू यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी बोलताना पीएमपीएमएल बससेवा सुलभ करणे आणि सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. म्हाळुंगे गावच्या विकासात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नेहमी पुढाकार राहिला असून, म्हाळुंगे-सुस-बाणेर हा परिसर शिवसेनेशी एकनिष्ठ राहिला आहे, असे सांगत त्यांनी मयूर भांडे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच, टी.पी. स्कीमबाबत गावकऱ्यांच्या हरकती उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडणार असल्याचे आश्वासन दिले.
पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मतदान १५ जानेवारीला होणार असून, शिवसेनेला शहरात मजबूत कामगिरी करण्याचा विश्वास आहे.

