मुंबई-पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडीविरोधात आक्षेप घेतला, मग आता महाराष्ट्रात का नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपला केला आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल, त्यावेळी आपण काय करणार याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजपवर प्रहार केला.मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती केली आहे. आज शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा संयुक्त वचननामा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर आधारित प्रसिद्ध करण्यात आला. ‘मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा असे नाव या वचननाम्याला देण्यात आले आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवरून पश्चिम बंगालचा दाखला देत, भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
राज ठाकरे म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या, तेव्हा भारतीय जनता पक्ष सुप्रीम कोर्टात गेला होता. आता त्याच पक्षाचे आत्ताच्या महाराष्ट्रातील गोष्टींबाबत काय म्हणणं आहे? हे त्यांनी सांगावे, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला. पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुका तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रात तुम्ही करतात. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. आज तुम्ही सत्तेत आल्यावर काँग्रेसने असे केले म्हणून आम्ही तसे करत आहोत, असे तुम्ही म्हणत आहात. उद्या तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दाम दुपटीने जेव्हा पुढे सुरू होईल तेव्हा कोणाकडे तक्रार करू नका,” असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय संस्कृतीबद्दल चिंता व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, “उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल, त्यावेळी आपण काय करणार याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा. महाराष्ट्राचा, यूपी बिहार करत आहेत. महाराष्ट्राचे अशाप्रकारे वाटोळे करणे, महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांचे वाटोळे करणे, महाराष्ट्रात जे राजकारणात येऊ इच्छितात, त्यांची विचारसरणी बदलणे हे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे. या सर्व गोष्टींचा विचार राजकीय पक्षांनी करणे गरजेचे आहे.”
देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार असल्याचे तसेच शिंदेंचा उल्लेख बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ असा केला होता. या वक्तव्याबाबत राज ठाकरे यांना विचारले असता राज ठाकरे यांनी सुरुवातीला फक्त स्मितहास्य करत उत्तर दिले. पत्रकारांनी जेव्हा राज ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली, तेव्हा राज ठाकरे म्हणाले, “मी हसलो खरं तर, मी नंतर हसलो. मी शांतपणे हसलो… संजय राऊत जोरात हसले… हे त्याचे उत्तर…” असं राज ठाकरे यांनी म्हटले. त्यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांचं वक्तव्य विनोद होता. त्यावर आपण हसलो, असं सांगण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला.
मराठी महापौरच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, हा महाराष्ट्र आहे आणि इथला प्रत्येक महापौर हा मराठीच होणार. इथे कसले हिंदी मराठी करता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा महाराष्ट्र आहे, इथे मराठीचा मान ठेवलाच पाहिजे. मुंबईचा महापौर मराठीच होणार, असेही राज्य ठाकरेंनी ठणकावून सांगितले.
राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कामांसाठी परवानगी असे, पण आम्ही जी काही चांगली कामे वचननाम्यात मांडली आहेत त्याला केंद्र आणि राज्याने विरोध करून दाखवावा, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
शिवसेना भवनातील आठवणींना उजाळा देताना राज ठाकरे म्हणाले की, “मी खूप वर्षांनंतर इथे आलोय. आज २० वर्षांनंतर इथे आल्यावर मला आपण जेलमधून सुटून आल्यासारखे वाटत आहे नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच पाहत आहे, कारण माझ्या मनात कोरल्या गेलेल्या आठवणी जुन्या वास्तूतील आहेत. १९७७ साली हे भवन झाले आणि त्याच वर्षी जनता पक्षाचे सरकार आल्यावर इथे दगडफेक झाली होती, तिथपासूनच्या सर्व आठवणी आजही ताज्या आहेत”.

