पुणे:’मोक्का’ गुन्ह्यातील फरार आरोपी सादिक हुसेन कपूर (वय ५६, रा. सय्यदनगर, हडपसर) याने कॅम्प परिसरातील आपल्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली..
आत्महत्या करण्यापूर्वी सादिक कपूरने ३० ते ३३ पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. या नोटमध्ये अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार फारूख शेख यांच्यासह अन्य काही व्यक्तींच्या नावांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कपूरचे ईस्ट स्ट्रीट परिसरातील कुमार पॅलेस सोसायटीमध्ये २८ क्रमांकाचा गाळा होता, जिथे त्याचे कार्यालय होते. याच कार्यालयात त्याने पंख्याला गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सादिकला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून, तिची पडताळणी सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक कपूर हा हडपसर परिसरातील कुख्यात गुंड टिपू पठाण याच्यासोबतच्या ‘मोक्का’ गुन्ह्यात पाहिजे होता. टिपू पठाण सध्या कारागृहात असून, सादिक या गुन्ह्यात फरार होता. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आत्महत्या केलेल्या सादिक कपूर यानी आत्महत्या करताना फारुख शेख यांचे नाव हातावर लिहिले आहे. फारुख शेख हे प्रभाग ३५ मधून अजित पवार गटाचे उमेदवार आहे. माजी नगरसेवक आणि उद्योगपती फारुख शेख हे बिल्डर कॉन्ट्रक्ट घेतात. फारुख शेख गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, शेतकरी देखील आहे. विविध देशातील आंब्यांवर प्रयोग करुन ते भारतात पिकवतात, असा दावा करतात. जपानचा आंबा पिकवतो म्हणून ते प्रसिद्धीच्या झोतात आले. कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल आहे. सोबतच विविध लहान मोठे गुन्हे दाखल आहेत. मोक्का अंतर्गत कारवाईदेखील त्याच्यांवर झाली आहे.

