पुणे:आता साहित्य क्षेत्रातही ‘गौतम अदाणी’ यांच्या नावावरून वादाचे वादळ उठले आहे. बारामती येथील ‘शरद पवार सेंटर फॉर एक्सलन्स इन एआय’ (Sharad Pawar Center for Excellence in AI) या वास्तूच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदाणी यांना निमंत्रित केल्याच्या निषेधार्थ ८ नामांकित लेखकांनी ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’चे मार्गदर्शक पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील लेखकांचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
गेल्या ४ वर्षांपासून या फेलोशिपसाठी मार्गदर्शक म्हणून काम पाहणाऱ्या लेखकांनी सामूहिकरीत्या हा निर्णय घेतला आहे. यामध्ये लेखक नितीन रिंढे, राजीव नाईक, गणेश विसपुते, किरण येले, रणधीर शिंदे, चंद्रशेखर फणसळकर, प्रमोद मुनघाटे, शरद नावरे यांसारख्या मान्यवरांचा समावेश आहे. ही मंडळी गेल्या 4 वर्षापासून सदर फेलोशिपसाठी मार्गदर्शक म्हणून सहभागी होते.
नेमका आक्षेप
साहित्यिकांनी आपल्या पत्रात पद सोडण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. “धार्मिक आणि आर्थिक पक्षपात तसेच सध्याच्या राजकीय सत्तेला आणि त्यांच्या विचारसरणीला आमचा ठाम विरोध आहे. त्याच पक्षाशी गौतम अदाणींचे घनिष्ठ संबंध आहेत. अशा व्यक्तीला शरद पवार यांनी सेंटरच्या उद्घाटनाला बोलावणे ही बाब आम्हाला खटकली आहे. त्यामुळे आम्ही या फेलोशिपच्या मार्गदर्शक पदाचा त्याग करत आहोत,” असे या लेखकांनी पत्रात नमूद केले आहे.
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आणि लेखकांचे स्पष्टीकरण
या पत्राबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारले असता, “असे कोणतेही पत्र अद्याप माझ्यापर्यंत पोहोचलेले नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, लेखक प्रमोद मुनघाटे म्हणाले की, “आम्ही सर्व लेखकांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वजण वेगवेगळ्या शहरांत राहत असल्याने पत्रावर सर्वांच्या सह्या होऊ शकल्या नाहीत, मात्र आमचा निर्णय ठाम आहे. वाय. बी. चव्हाण सेंटरसारखी साहित्यात काम करणारी दुसरी संस्था नाही, तरीही तात्विक विरोधापोटी आम्ही हा निर्णय घेतला आहे.”
पत्रात नेमके काय म्हटले?
गेली चार वर्षे आम्ही ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (साहित्य)’ चे काम करीत आहोत. या फेलोशिपसाठी फेलो लेखकांची निवड करणे, त्यांना मार्गदर्शन करणे अशा स्वरूपाचे हे कार्य आहे. मराठीमध्ये पुस्तक लेखनासाठी अशा तऱ्हेची फेलोशिप असावी असा आम्हा सगळ्यांचा विचार होता. यशवंतराव चव्हाण सेंटरने ही फेलोशिप सुरू केल्याचा आम्हाला आनंद झाला. शरदराव पवार आणि आपण स्वतः यांचे साहित्य-कलांप्रति असणारे प्रेम पाहता आम्ही आपल्या निमंत्रणावरून फेलोशिप यशस्वी व्हावी यासाठी पूर्ण शक्तीनिशी काम केले.
फेलोशिपच्या या कार्यात यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सर्व सहकाऱ्यांचे आम्हाला उत्तम सहकार्य लाभले. फेलोशिपच्या आजवरच्या कामात आयोजकांनी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले. कुठल्याही प्रकारच्या विचारसरणीचा दबाव आणला नाही. अगदी मोकळ्या व सौहार्द्रपूर्ण वातावरणामध्ये व सर्व प्रकारच्या प्रेमळ सहकार्याने सारे कामकाज झाले. म्हणूनच आज ह्या उपक्रमातून आम्ही बाहेर पड्डू इच्छितो हे कळवायला आम्हाला अतिशय वाईट वाटत आहे.
शरदराव पवार राजकारणात आहेत आणि संस्थापालकही आहेत. अशा माणसांना निरनिराळ्या परिस्थितींना सामोरे जावे लागते आणि वेगवेगळे पेच सोडवावे लागतात. विविध संस्थांच्या कारभाराकरता निधी उभारावा लागतो आणि उद्योजकांच्या व इतरांच्या साहाय्याची वेळप्रसंगी मदतही घ्यावी लागते. हे सर्व ध्यानात बाळगूनही आम्ही फेलोशिपच्या ह्या उपक्रमातून बाहेर पडत आहोत. कारण ‘शरद पवार सेंटर फॉर एक्सलन्स इन ए. आय. ‘च्या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिकेतली भाषा (‘शुभहस्ते’) आणि धार्मिक व आर्थिक पक्षपात इत्यादी अनेक कारणांसाठी ज्या राजकीय सत्तेला व त्यांच्या विचारसरणीला आमचा विरोध आहे, त्या पक्षाशी अनेक पातळ्यांवर घनिष्ट संबंध असलेल्या उद्योजकांचं जणू प्रतिनिधित्व करणाऱ्या इसमाला दिलेला सन्मान. हुकुमशाही, मक्तेदारी, क्रोनी-भांडवलशाही, धर्मपक्षपात इत्यादी प्रतिगामी व समाजविघातक मुल्यांचा शरदराव पवार विरोध करतात असे आम्हाला वाटत असल्याने ह्या सोहळ्याचा आम्हाला धक्का बसला.
कदाचित त्यांची ही राजकीय गरज वा खेळीही असेल, परंतु फेलोशिपचा उपक्रम हा साहित्यनिर्मितीचा उपक्रम आहे. या उपक्रमात निवड केल्या जाणाऱ्या फेलो लेखकांच्या लेखनाशी म्हणजेच त्यामागे असलेल्या त्या लेखकांच्या जाणिवा, त्यांचे विचार यांच्या घडणीशी आमचा मार्गदर्शक म्हणून संबंध येतो. सदर फेलोशिप राबवणाऱ्या आयोजकांकडून कोणत्याही कारणाने प्रतिगामी व समाजविघातक मूल्य-समर्थक व्यवस्था/व्यक्ती यांच्याशी जवळिकीचे प्रदर्शन घडवले जात असेल, तर काय करावे? आम्ही फेलो लेखकांशी नैतिक मूल्ये, जीवनदृष्टी इत्यादींबाबत संवाद साधणे, त्यांच्या साहित्याकडून त्या अपेक्षा ठेवणे ढोंगीपणाचे ठरेल. याच कारणामुळे अतिशय जड अंतःकरणाने आम्ही शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (साहित्य) या उपक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत.

