सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर बोलताना ‘पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला. स्थानिक नेत्यांची राक्षसी भूक दिसून आली’ अशी टीका केली होती. त्यांच्या या टिकेनंतर आता भाजपाच्या नेत्यांकडून अजित पवारांना इशारा देण्यात येत आहे.
अजित पवारांना सोबत घेतल्याचा पश्चाताप असल्याचं मोठं वक्तव्य रविंद्र चव्हाण यांनी केलं. त्यानंतर आता भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. ‘आम्हाला दमात आणि हलक्यात घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देखील आमच्याकडेच आहे’, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना सुनावलं आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यासमोर निवडणुकीचं एक धोरणं मांडलं. ही निवडणूक आपल्याला विकासावर न्यायची आहे. महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर अजिबात टीका करायची नाही. मात्र, टीका करायला सुरुवात झाली. ही टीका किती चालणार? कुठे थांबणार? याचा अंदाज घेऊ. मागच्या नगरपरिषदांच्या निवडणुकीत टीका करणाऱ्यांनी म्हटलं होतं की तिजोरीची चावी आमच्याकडे आहे, त्यानंतर मी भोरमधील एका सभेत म्हटलं होतं की तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
“मी आता असं म्हणेन की, ‘ये घरला जायचयं का?’ असं म्हणणाऱ्यांना मी सांगतो की, मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडेच आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका”, असा अप्रत्यक्ष इशारा चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना दिला आहे.
‘…तर अजित पवारांच्या अडचणी वाढतील’; रवींद्र चव्हाण यांचा इशारा
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड येथे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर आरोप केले होते. त्या आरोपांना चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की, ‘अजित पवार यांनी पहिल्यांदा स्वत:च्या पक्षाकडे पाहिलं पाहिजे. ‘खुदके गिरेबान में झांकना चाहिये’ अशी एक म्हण हिंदीत आहे. आम्ही आरोप केले तर अजित पवारांच्या अडचणी वाढतील,’ अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांना शनिवारी इशारा दिला.’पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल आपण बोलत आहोत, हे त्यांनी ध्यानात ठेवावं.’
‘अजित पवारांना सोबत घेतल्याचा पश्चाताप’, रवींद्र चव्हाण
उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपासोबत कशापद्धतीने जोडले गेले, हे सर्वांना माहिती आहे. त्यांना सोबत घेण्याबाबत पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे पदाधिकारी मला थोडा विचार करा म्हणून सांगत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी नेहमी खासगीत सांगायचो की थोडा विचार करावा. पण आता पवार यांना सोबत घेत असल्याचा पश्चाताप होत आहे’, असं मोठं वक्तव्य रविंद्र चव्हाण यांनी केलं. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निगडीतील कार्यक्रमात चव्हाण बोलत होते

