लाडकी बहीण योजनेवर अपप्रचार फसला; जनता शिवसेनेच्या पाठीशी; शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे दि.३: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना स्वबळावर उतरली असून, शिवसेना प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, नवसाला पावणारा श्रीमंत दगडूशेठ गणपती यांच्या चरणी प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आला. सर्वांच्या वतीने आरती करून व जैन मंदिर येथे दर्शन घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची मंगलमय सुरुवात करण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्क येथे शिवसैनिकांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मंत्री विजय शिवतारे, शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, अजय भोसले, आबा बागुल, युवा नेते किरण साळी आणि रमेश कोंडे यांसह मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
‘ही लढाई शिवशक्ती विरुद्ध धनशक्तीची’
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “समोर धनाढ्य आहेत, आपल्याकडे संघर्ष करणारे शिवसैनिक आहेत. शिवसैनिकांनी नेहमी धनशक्तीला भुईसपाट केले आहे. राज्यात प्रथमच शिवसेना १२० हून अधिक जागांवर लढत आहे. उमेदवारांचा आत्मविश्वास पाहता, निकालानंतर पुण्याचा महापौर बनवताना शिवसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या समस्या सोडवल्या असून, पुणेकर शिवसेनेला साथ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटच्या दिवसांत दबाव-दादागिरी होऊ शकते, मात्र शिवसैनिक घाबरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे: लाडकी बहीण योजनेवर अपप्रचार फसला; जनता शिवसेनेच्या पाठीशी
शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महायुती होऊ शकली नाही, यासाठी मोठ्या भावाची अधिक जबाबदारी होती. शिवसेनेच्या मागण्या सन्मानजनक होत्या.” लाडकी बहीण योजनेवर विरोधकांचा अपप्रचार जनतेने फेटाळला आहे. निवडणुकीत जनता पुन्हा शिवसेनेला साथ देईल. प्रचारात सकारात्मक राहावे, विरोधकांवर टीका टाळावी. शिंदे यांची पूर्ण ताकद उमेदवारांपाठीशी आहे.
शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात एकूण ११९ उमेदवार असून त्यामध्ये अनुसूचित जातीच्या दहा महिला आणि आठ पुरुष आहेत तर अनुसूचित जमातीचे एक, मुस्लिम समाजाचे पाच यामध्ये दोन महिला, तीन पुरुष आणि ५५ पुरुष व ६५ महिला उमेदवार देण्यात आलेल्या आहेत. जे की इतर पक्षांपेक्षा सर्वाधिक महिलांना उमेदवारी देणारा शिवसेना पक्ष ठरला असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
सत्तेत आल्यास पीएमपीमध्ये महिलांना अर्धे तिकीट, प्रत्येक प्रभागात ‘आपला दवाखाना’, नवीन धरणे, अपघात-कोंडीमुक्त पुणे, मंदिरांचे संरक्षण करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

