सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला प्रशिक्षण परिसंवादातून सक्षमीकरणाचा नवा संकल्प
पुणे, दि. ३ जानेवारी २०२६ :
स्त्री आधार केंद्र, पुणे यांच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त महिला प्रशिक्षण विषयक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्त्री आधार केंद्राच्या मानद अध्यक्षा व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे या ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होत्या.
महाराष्ट्रात महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असलेल्या स्त्री आधार केंद्राने गेल्या चार दशकांहून अधिक काळ महिलांच्या हक्कांसाठी, जनजागृतीसाठी व न्यायासाठी केलेल्या कार्याचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अपर्णा पाठक (विश्वस्त, स्त्री आधार केंद्र) यांनी संस्थेच्या आगामी उपक्रमांची दिशा स्पष्ट केली. स्त्री सक्षमीकरणासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण, संघटनात्मक एकात्मता आणि उद्दिष्टांशी सुसंगत कृती या बाबी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर प्रशांत पिसाळ ,विशेष कार्य अधिकारी यांनी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देत, त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा तसेच त्यातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संस्थेच्या ४२ वर्षांच्या प्रेरणादायी वाटचालीचा सखोल आढावा घेतला. “समतेसाठी निरंतर कृती” हे स्त्री आधार केंद्राचे बोधवाक्य असून, संस्थेचे सर्व उपक्रम या तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहेत की नाही याचा सातत्याने आढावा घेतला जातो, असे त्यांनी सांगितले.
स्त्री आधार केंद्र हे १९९९ पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक व सामाजिक परिषदेचे (ECOSOC) सभासद असल्याची माहिती देत, दर दोन व चार वर्षांनी सादर कराव्या लागणाऱ्या अहवालांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. महिलांवरील हिंसा कमी करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, या उद्दिष्टांसाठी संस्थेचे कार्य अविरत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर झालेल्या गटचर्चा सत्रात ‘बाह्य सौंदर्य’ या विषयावर प्रज्ज्वला भिंगारे यांनी मार्गदर्शन करत सांगितले की, सौंदर्य ही केवळ बाह्य बाब नसून आत्मविश्वास, विचारांची प्रगल्भता आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य यामध्ये खरे सौंदर्य दडलेले आहे.
‘काम करताना होणारा विरोध’ या विषयावर अॅड. सुवर्णा कांबळे यांनी महिलांना मार्गदर्शन करत, कार्यक्षेत्रातील अडचणी, सामाजिक विरोध आणि मानसिक दबाव यांना सामोरे जाताना स्वतःच्या हक्कांची जाणीव, कायदेशीर माहिती आणि संघटित ताकद महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.
यानंतर दूरदर्शन व आकाशवाणीच्या निवेदिका स्वाती महाळंक यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व विशद करत सांगितले की, “माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो. काळाबरोबर चालण्यासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण अत्यावश्यक आहे.” आजचा काळ झपाट्याने बदलत असून, केवळ अनुभव पुरेसा नसून सतत नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण घेतले नाही, तर काळाच्या शर्यतीत मागे पडण्याची भीती असते, असे त्यांनी नमूद केले. तळागाळातील, अल्पशिक्षित महिलांच्या अंगभूत कौशल्यांवर आधारित प्रशिक्षण देऊन त्यातून आर्थिक उत्पन्न कसे मिळवता येईल, यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बचत गट चळवळ, स्वच्छता, व्यवस्थापन कौशल्ये आणि गुणवत्तेचे निकष पाळणे हा देखील प्रशिक्षणाचाच भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्त्री आधार केंद्राच्या वतीने यापूर्वी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा सविस्तर अहवाल अॅड. सुवर्णा कांबळे व प्रज्ज्वला भिंगारे यांनी सादर केला. कार्यक्रमाचे संयोजन अनिता शिंदे व आश्लेषा खंडागळे यांनी केले तर, सूत्रसंचालन मेघना सावंत-भोसले यांनी केले.
सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित महिला सक्षमीकरणाचा संकल्प दृढ करणारा हा परिसंवाद उपस्थित महिलांसाठी प्रेरणादायी ठरला.

