पुणे, दि. ३ जानेवारी २०२६ :
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण आणि समाजसुधारणेच्या क्षेत्रात केलेले कार्य ऐतिहासिक असून त्यांच्या विचारांमुळेच आज महिलांना शिक्षण, सक्षमीकरण आणि समानतेच्या दिशेने वाटचाल करता येत आहे. सावित्रीबाईंच्या संघर्षातूनच आज महिलांसाठी विविध योजना, संधी आणि ‘लाडक्या बहिणी’सारखे उपक्रम उभे राहिले आहेत.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, सामान्य महिलांना दिलासा मिळेल अशा योजना प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच शाळाबाह्य मुलींसाठी संस्कार वर्ग सुरू करण्याबाबतही प्रयत्न केले जातील. सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली, यामुळेच महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळाली, असे त्यांनी नमूद केले.
आजही समाजात मुलींवरील अत्याचार, बालविवाह आणि शिक्षणापासून वंचित राहण्यासारख्या समस्या अस्तित्वात आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘सेफ कॅम्पस’ संकल्पनेवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, पुणे माळी महासंघाच्या हेमाताई लडकत, बाळासाहेब लडकत, प्रज्वल बनकर, यशोधन आखाडे, महात्मा फुले मंडळाचे विश्वस्त योगेश वाघोले, पर्वती प्रभागातील शिवसेना उमेदवार महेंद्र जोशी, तुषार भामरे, भारती जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

